PM Modi On Third Term: माझ्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील टॉप तीन मध्ये असेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी व्यक्त केला. दिल्लीतील प्रगती मैदानावर भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपच सत्तेत येणार आणि आपणच पंतप्रधान होणार असा दावाही मोदींनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "ट्रॅक रेकॉर्डच्या आधारे मी सांगत आहे की, "तिसऱ्या टर्ममध्ये भारताचे नाव जगातील पहिल्या तीन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये असेल. म्हणजेच माझ्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये अभिमानाने उभा राहील. 2024 मध्ये आमच्या तिसर्या कार्यकाळात देशाचा विकास प्रवास अधिक वेगाने होईल. तुमची स्वप्ने तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण होताना दिसतील." पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याकडे लोकसभा निवडणुकीतील विजयाचा दावा म्हणून पाहिले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, "आमच्या पहिल्या कार्यकाळाच्या सुरुवातीला भारत जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावर होता. लोकांनी आमच्या हाती सत्ता दिली त्यावेळी आम्ही दहाव्या क्रमांकावर होतो. दुसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. आता आंतरराष्ट्रीय एजन्सी असेही सांगत आहेत की भारतातील गरिबी संपण्याच्या मार्गावर आहे."
काय म्हणाले पीएम मोदी?
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारत ही लोकशाहीची जननी असल्याचं आता जगाने स्वीकारलं आहे. आज आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असताना अमृत महोत्सव साजरा करत आहोत, तेव्हा हा भारत मंडपम ही आम्हा भारतीयांनी आपल्या लोकशाहीला दिलेली एक सुंदर भेट आहे."
पंतप्रधान म्हणाले की, "काही आठवड्यांनंतर येथे G-20 शी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातील. जगातील बड्या देशांचे प्रमुख येथे उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण जगाला भारताची पुढे पडणारी पावले आणि भारताची वाढती उंची या भारत मंडपममधून दिसेल."
कारगिलचा उल्लेख
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आजचा दिवस प्रत्येक देशवासियांसाठी ऐतिहासिक आहे. आज कारगिल विजय दिवस. देशाच्या शत्रूंनी दाखवलेल्या कृत्याला भारत मातेच्या सुपुत्रांनी आपल्या शौर्याने पराभूत केले. संपूर्ण देशाच्या वतीने मी कारगिल युद्धात बलिदान दिलेल्या प्रत्येक वीराला श्रद्धांजली अर्पण करतो."
ही बातमी वाचा: