PM Modi Inaugurates Ramanujacharya Statue: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज हैदराबादच्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधानांच्या हस्ते 11 व्या शतकातील भक्तीमार्गीय संत रामानुजाचार्य यांचा 216 फूट उंच पुतळ्याचे (Statue of Equality) अनावरण होणार आहे. त्यांच्या हस्ते हैदराबादमधील पटट्णसेरू येथे आंतरराष्ट्रीय अर्ध-उष्ण कटीबंधीय कृषी संशोधन केंद्राच्या पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याचा आरंभ करण्यात येणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय अर्ध-उष्ण कटीबंधीय कृषी संशोधन केंद्राच्या खास तयार केलेल्या बोधचिन्हाचे अनावरण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याच्या संस्मरणार्थ टपाल तिकीट प्रदर्शित करण्यात येणार आहे.
दुपारी 2.45 च्या सुमारास हैदराबादमधील पटट्णसेरू येथे आंतरराष्ट्रीय अर्ध-उष्ण कटीबंधीय कृषी संशोधन केंद्राच्या पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याचा आरंभ पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्यानंतर संत रामानुजाचार्य यांच्या 216 फूट उंच असलेल्या पुतळ्याचे मोदींच्या हस्ते अनावरण होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, ही मूर्ती 11 व्या शतकातील भक्ती शाखेचे संत श्री रामानुजाचार्य यांच्या स्मरणार्थ बनवण्यात आली आहे. ही मूर्ती सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त यांच्या मिश्रणाने बनलेली 'पंचधातू' आहे. हा बैठक स्थितीतील पुतळा जगात सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. हा पुतळा 54 फूट उंच अश्या भद्रवेदी नामक इमारतीवर उभारला आहे. त्या इमारतीमध्ये डिजीटल वैदिक ग्रंथालय व संशोधन केंद्र, प्राचीन भारतीय लिखाण, नाट्यगृह, शैक्षणिक गॅलरी आहे. रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याची कल्पना रामानुजाचार्य आश्रमाचे चिन्ना जीयार स्वामी यांची आहे.
आजच्या या कार्यक्रमादरम्यान संत रामानुजाचार्य यांच्या जीवन प्रवास आणि शिक्षणावरील 3D सादरीकरण मॅपिंगचे प्रात्यक्षिकही दाखवले जाईल. त्यानंतर पंतप्रधान दिव्य देसम च्या 108 कोरीव मंदिरांनाही भेट देणार आहेत. रामानुजाचार्य हे महान सुधारक होते. ज्यांनी 1 हजार वर्षापूर्वी समाजातील अनिष्ठ रूढी परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला. रामानुजाचार्य यांचा पुतळा म्हणजे समानतेचा पुतळा आहे. त्याचे अनावरण बुधवारपासून 12 दिवस असणाऱ्या रामानुज सहस्त्राब्दी समारोपप्रसंगी केले जाणार आहे. वैष्णव संत रामानुजाचार्य यांची 1000 वी जयंतीनिमित्त सुरु झालेल्या या कार्यक्रमामध्ये 2 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत 1 हजार 35 कुंडांतून 14 दिवस महायज्ञाचा कार्यक्रम केला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: