Narendra Modi : गेल्या 24 तासात दोन वेळा पंतप्रधानांकडून इंधन बचतीचे अपील, लॉकडाऊन लागणार का? जाणून घ्या 3 मोठी कारणे
PM Modi Fuel Saving Appeal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल-डिझेल बचतीचे आवाहन केलं आहे. त्यावरून आता वेगवेगळ्या चर्चा रंगल्याचं चित्र आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अवघ्या 24 तासांत दोन वेळा देशवासीयांना पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा वापर जपून करण्याचं आवाहन केलं आहे. पश्चिम आशियातील तणाव, वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ऊर्जा बचतीवर भर दिला. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार तशी कोणतीही परिस्थिती नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
Fuel Stock In India : भारताकडे 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा
केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की देशात पेट्रोल, डिझेल, एलपीजी किंवा नैसर्गिक वायूची कोणतीही कमतरता नाही. भारताकडे सुमारे 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा साठा उपलब्ध आहे. तसेच 45 दिवसांचा एलपीजी साठा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले तरी देशाची ऊर्जा सुरक्षा भक्कम राहणार आहे.
Forex Reserves India : 703 अब्ज डॉलरचा मजबूत परकीय चलनसाठा
सरकारच्या माहितीनुसार, भारताचा परकीय चलनसाठा 703 अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. हा साठा देशाच्या आयातीसाठी सुमारे 10 ते 11 महिन्यांचे संरक्षण कवच मानला जातो. वाढत्या तेल आयात खर्चाच्या काळातही हा चलनसाठा अर्थव्यवस्थेला स्थैर्य देणारा ठरत आहे.
Oil Refining Capacity India : जगातील तिसरा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण देश
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण (Oil Refining) करणारा देश असून पेट्रोलियम उत्पादनांचा चौथा सर्वात मोठा निर्यातदार आहे. देशाची वार्षिक रिफायनिंग क्षमता सुमारे 250 ते 255 दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे. 2030 पर्यंत ही क्षमता 450 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
Why PM Modi Appealed : इंधन बचतीमागील आर्थिक रणनीती
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन हे कोणत्याही निर्बंधांचे संकेत नसून आर्थिक शिस्तीचा भाग आहे. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85 टक्के कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा वापर कमी केल्यास तेल आयात खर्च आणि परकीय चलनावरील दबाव कमी होऊ शकतो. यामुळे रुपया मजबूत राहण्यास आणि अर्थव्यवस्थेला आधार मिळण्यास मदत होईल.
No Lockdown Situation : घाबरण्याचे कारण नाही
सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की देशात इंधनाचा पुरेसा साठा आहे आणि नागरिकांनी घाबरून पेट्रोल पंपांवर गर्दी करण्याची आवश्यकता नाही. पंतप्रधानांचे आवाहन हे संकटकाळात जबाबदारीने संसाधनांचा वापर करण्यासाठी केलेले आहे, लॉकडाऊनसारख्या परिस्थितीचे संकेत नाहीत.
ही बातमी वाचा:
Before You Go
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल





















