नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्रींविरुद्ध आक्षेपार्ह शब्दांचा वापर करणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला पंतप्रधान मोदींनी माफ केल्यानंतर, त्या मुलीच्या आईने पंतप्रधानांचे मनापासून आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदींच्या या माफीच्या निर्णयाने माझ्या मुलीला नवीन जीवनदान दिले आहे, अशा शब्दांत त्या आईने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

Continues below advertisement

दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या एका आंदोलनादरम्यान या अल्पवयीन मुलीचा आक्षेपार्ह टिप्पणी करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर खुद्द पंतप्रधान मोदींनी संयम बाळगण्याचे आवाहन करत त्या मुलीला माफ केले होते.

Minor Girl Video On PM Modi : 'पंतप्रधानांनी बदला न घेता क्षमेचा मार्ग निवडला'

वृत्तसंस्था पीटीआय (PTI) शी बोलताना मुलीच्या आईने हात जोडून पंतप्रधान मोदींचे आभार मानले. त्या म्हणाल्या, "माझ्या मुलीने अत्यंत चुकीच्या भाषेचा वापर केला होता, परंतु पंतप्रधानांनी बदला घेण्याऐवजी क्षमेचा मार्ग निवडून आपली महानता सिद्ध केली आहे. आज पंतप्रधानांचा वाढदिवस असून त्यांनी माझ्या मुलीला दिलेली ही माफी म्हणजे तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आणि पुनर्जन्म आहे."

Continues below advertisement

मुलीच्या आईने पुढे एक भावूक मागणी करत म्हटले की, "मोदीजींनी माझ्या मुलीला माफ करून खूप मोठे काम केले आहे. आता माझी एकच विनंती आहे की त्यांनी माझ्या मुलीला दत्तक घ्यावे."

Demand For Instagram Ban : मुलांसाठी इंस्टाग्राम बंद करण्याची मागणी

या घटनेचा उल्लेख करताना मुलीच्या आईने लहान मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, "कमी वयातील मुले सहजपणे चुकीच्या संगतीला आणि चुकीच्या विचारांना बळी पडतात. त्यामुळे मुलांसाठी इंस्टाग्रामसारखे प्लॅटफॉर्म पूर्णपणे बंद केले पाहिजे, जेणेकरून कोणतीही मुले अशा भलत्या प्रकरणात अडकणार नाहीत."

Delhi Jantar Mantar Protest : जंतर-मंतर आंदोलनातील व्हायरल व्हिडीओ प्रकरण

हे प्रकरण दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेतृत्वाखाली झालेल्या नीट-युजी (NEET-UG) पेपरफुटीविरोधातील आंदोलनादरम्यान समोर आले होते. आंदोलनात काही आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आली होती. यावर पंतप्रधान मोदींनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. "अशी कृत्ये करणारी मुले भरकटलेली असून, अशा गोष्टींना क्रोधाने किंवा प्रतिशोधाने उत्तर देता कामा नये," असे मोदी म्हणाले होते.

Minor Girl Apology Video : 'माझ्याकडून खूप मोठी चूक झाली' 

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर संबंधित मुलीचा एक माफीनामा व्हिडीओ समोर आला. त्यात तिने म्हटले की, "मी 15 वर्षांची असून मित्रांसोबत फिरताना आंदोलनात सहभागी झाले होते. तेथे सुरू असलेल्या घोषणाबाजीत मी वाहत गेले आणि माझ्याकडून ही गंभीर चूक झाली. हे माफ करण्यायोग्य नाही, परंतु ही माझी पहिली आणि शेवटची चूक समजून संपूर्ण देशाने मला माफ करावे."

Delhi Police Legal Action : कायदेशीर कारवाईबाबत काय अपडेट?

मुलीने जाहीर माफी मागितली असली तरी या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. 23 जुलैच्या घटनेप्रकरणी नोएडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती, ज्यानंतर झिरो एफआयआर (Zero FIR) नोंदवून हे प्रकरण नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. या वक्तव्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याचा धोका असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

ही बातमी वाचा :