नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांसोबतच देशातील मृत्यूदरातही वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे पार पडणार आहे. ज्यामध्ये मंत्रिमंडळाच्या सदस्यांव्यतिरिक्त केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे.
देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. अशातच याकाळातील केंद्रीय मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक असणार आहे. या बैठकीत 18 ते 44 नागरिकांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. 1 मेपासून लसीकरणाचा हा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच मंत्र्यांना जनतेसोबत चर्चा करुन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं. यापूर्वी पंतप्रधानांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती.
पंतप्रधानांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकींचं सत्र सुरुच
पंतप्रधानांच्या वरिष्ठ सरकारी अधिकारी, औषध निर्माच्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी, ऑक्सिजन निर्मात्या कंपन्या, लष्कर, वायुसेना यांच्या प्रमुखांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकींचं सत्र सुरुच आहे.
देशात कोरोना रुग्णसंख्येचा विक्रम, गेल्या 24 तासात 3.86 लाख नव्या रुग्णांची भर
भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. गेल्या 24 तासात देशात 3,86,452 नव्या रुग्णांची भर पडली असून 3498 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या आतापर्यंतची सर्वाधिक मोठी संख्या आहे. गेल्या 24 तासात 2,97,540 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. बुधवारी देशात 3.79 लाख नव्या रुग्णांची भर पडली होती.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या
मागील काही दिवसांपासून राज्यात सातत्याने 60 हजारांच्यावर नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. राज्यात गुरुवारी तब्बल 66 हजार 159 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. दिलासादायक म्हणजे गुरुवारी एकाच दिवसात 68 हजार 537 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 37,99,266 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. राज्यात एकूण 6,70,301 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.69% झाले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus Updates: देशात कोरोना रुग्णसंख्येचा विक्रम, गेल्या 24 तासात 3.86 लाख नव्या रुग्णांची भर तर 3498 जणांचा मृत्यू
- 15 महिन्यांपासून काय करताय? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरुन मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलं
- Covid-19 Second Wave | कोरोना संकटात भारताला 40 हून अधिक देशांकडून मदतीचा हात