नवी दिल्ली : अंधश्रद्धेला फाटा देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज नोयडाला भेट दिली. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थीतीत दिल्लीतील कालकाजी ते नोयडाच्या बॉटेनिकल गार्डनपर्यंतच्या नव्या मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केलं. या नव्या मेट्रो सेवेचं नाव मॅझेंटा लाईन आहे. या कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं मुक्तकंठाने कौतुक केलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली उत्तर प्रदेश सरकार विकासाची कामं अतिशय जलद गतीनं करत आहे. त्यांच्या पेहराव्यावरुन अनेकवेळा भ्रम पसरवला जातो की, ते अतिशय रुढवादी, परंपरावादी आहेत. पण मला आनंद वाटतो की, ज्या नोयडात येण्याची हिम्मत यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली नाही. त्याच नोयडात येऊन योगी आदित्यनाथ यांनी सर्व अंधश्रद्धांना मुठमाती दिली आहे."

जे मुख्यमंत्री नोयडाला भेट देतात, त्यांचं पद जातं, अशी अंधश्रद्धा उत्तर प्रदेशच्या राजकारणात आहे.

यापूर्वी ज्या मुख्यमंत्र्यांनी नोयडाला भेट दिली होती, त्यांना पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. यापूर्वी समाजवादी सरकारच्या कार्यकाळातही तत्कालिन मुख्यमंत्री आखिलेश यादव यांनी नोयडाचा दौरा नेहमी टाळला होता. तर मुलायम सिंह, कल्याण सिंह, राजनाथ सिंह यांना नोयडा दौऱ्यानंतर पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.

1988 मध्ये काँग्रेसचे वीर बहादुर सिंह यांनी आपला नोयडाचा दौरा अटोपून राजधानी लखनऊमध्ये परतल्यावर, त्यांना आपली खुर्ची सोडावी लागली होती. तर 1989 मध्ये काँग्रेसचे आणखी एक नेते एन.डी. तिवारी यांनाही खुर्ची सोडावी लागली. 1999 मध्ये कल्याण सिंह यांनाही नोयडा दौरा भोवला होता.

1995 मध्ये मुलायम सिंह यांनीही नोयडा दौरा केल्यानंतर, त्यांना सत्ता गमवावी लागली. तर 2012 मध्ये बसपा सुप्रीमो मायावती यांनी नोयडाचा दौरा केल्यानंतर, सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यानिमित्त सुरुवातीपासून प्रश्न उपस्थित केले जात होते.