नवी दिल्ली: 'सिंघम' सारख्या चित्रपटांपासून प्रभावित होवू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा आयपीएस अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यांनी म्हटलं की काही पोलिस अधिकारी सुरुवातीपासूनच दिखावा करत राहतात आणि त्या नादात पोलिसांच्या मुख्य कर्तव्याकडे दुर्लक्ष करतात. पंतप्रधान मोदी म्हणाले की,"नवीन ड्यूटी जॉईन केलेले काही अधिकारी 'सिंघम' सारख्या चित्रपटांपासून प्रभावित होतात आणि दिखावाच जास्त करतात. लोकांनी आपल्याला घाबरलं पाहिजे आणि समाजकंटकांनी आपलं नाव ऐकताच थरथर कापलं पाहिजे ही गोष्ट त्यांच्या डोक्यात फिट होते. आणि त्यामुळेच जी काही मुख्य कर्तव्य करायची असतात त्याकडे दुर्लक्ष होते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.


शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकादमी येथे भारतीय पोलीस दलाच्या प्रशिक्षणार्थ्यांसमवेत दीक्षांत परेड सोहळ्याप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य करताना कोणत्याही गैरकृत्यात सामील होवू नका, असा देखील सल्ला दिली.


कोरोना काळात पोलिस प्रशासनाने केलेल्या कामाची प्रशंसा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "कोरोना काळात पोलिस प्रशासनाचा मानवी चेहरा समोर आला. त्यांनी लक्षणीय काम केले. कोरोनासंबंधी लोकांत जागरूकता वाढवण्यासाठी गाणी गायली, लोकांच्या जेवनाची सोय केली आणि रूग्णांना दवाखान्यात पोहचवण्याचे काम केले. कोरोना काळात मानवतेने खाकी वर्दीच्या रूपात काम केल्याचे सगळे लोक साक्षीदार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरच्या लोकांची प्रशंसा करताना म्हटले की तिथल्या माता आणि लहान मुलांना सोबत घेवून महिला पोलिस अधिकारी या युवकांना गैरमार्गाला जाण्यापासून थांबवू शकतात. ते पुढे म्हणाले की, "आपल्या महिला पोलिस अधिकारी यासंबंधी प्रभावीपणे काम करू शकतात. त्या माता-भगिनींना सुशिक्षित करू शकतात आणि रस्ता भटकलेल्या युवकांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणू शकतात. मला असा विश्वास आहे की जर सुरवातीच्या टप्प्यात तुम्ही हे काम केले तर आपण तिथल्या युवकांना चुकीच्या रस्त्यावर जाण्यापासून निश्चितपणे  थांबवू शकतो."


ते म्हणाले प्रशिक्षणार्थ्यांनी गणवेशाची शक्ती दाखवण्याऐवजी त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. “तुमच्या खाकी गणवेशाविषयीचा आदर कधीही गमावू नका. विशेषतः या कोविड-19 दरम्यान पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामांमुळे खाकी वर्दीचा मानवी चेहरा सार्वजनिक आठवणीत कोरला गेला आहे,” असे ते म्हणाले.


आयपीएस प्रशिक्षणार्थ्यांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले, “आतापर्यंत या सुरक्षित वातावरणात तुम्ही प्रशिक्षणार्थी होता. पण, तुम्ही या अकादमीतून बाहेर पडताक्षणी, एका रात्रीतून परिस्थिती बदलेल. तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. सजग राहा, तुमच्याबद्दलची पहिली प्रतिमा ही शेवटची प्रतिमा आहे. ज्या-ज्या ठिकाणी तुमची बदली होईल, ही प्रतिमा तुमच्या मागे येईल.”