नवी दिल्ली : कोरोनामुळं देशात कठिण परिस्थिती बनली आहे. या परिस्थितीत सर्वांनी नियमांचं पालन करत काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनावर जोवर औषध येत नाही, तोवर काही निष्काळजीपणा नको, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Parliament Monsoon Session) सुरुवात होत आहे. कोरोना काळात होणाऱ्या या संसदेच्या अधिवेशनात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत. अधिवेशन सुरु होण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कोरोनावर जगात कुठंही औषधं यावं ही इच्छा
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनावर जगात कुठंही औषधं यावं ही इच्छा आहे. आपले शास्त्रज्ञ देखील यावर प्रयत्न करत आहेत. अधिवेशनाच्या आयोजनाबाबत बोलताना मोदी म्हणाले की, खासदारांनी कर्तव्याचा मार्ग अवलंबला आहे. मी सर्व खासदारांचं आभार मानतो. याआधी अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेआधी आटोपावं लागलं होतं. यावेळी अधिवेशनात अनेक बदल केले आहेत. मात्र सर्वांनी याचं स्वागत केलं आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
जवानांच्या पाठिशी ताकतीने उभे
पंतप्रधान म्हणाले की, या अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय होतील, अनेक महत्वाच्या चर्चा होतील. लोकसभेत जितक्या महत्वाच्या चर्चा होतील, त्याचा देशाला फायदा होतो. यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करु, असंही ते म्हणाले. देशाच्या सीमेवर आपले जवान मोठ्या हिमतीने आपल्यासाठी तैनात आहेत. जवान दुर्गम भागात, पर्वतांवर, बर्फ पडत असताना आपल्या सुरक्षेसाठी विश्वासानं उभे आहेत. विपरित परिस्थितीत ते देशाची सेवा करत आहेत. या सदनात आम्ही सगळे त्या जवानांच्या पाठिशी ताकतीने उभे आहोत, असा संदेश आम्ही देऊ, असं मोदी म्हणाले.
आपण देखील काळजी घ्यावी, बातम्या तर मिळत राहतील, असं मोदी पत्रकारांना म्हणाले.
एका सभागृहाच्या कामकाजासाठी दोन सभागृहं वापरली जाणार
आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Parliament Monsoon Session) सुरुवात होत आहे. कोरोना काळात होणाऱ्या या संसदेच्या अधिवेशनात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत. त्यासाठी वेगवेगळी व्यवस्थाही करण्यात येत आहे. नेमके काय बदल, आणि कुठल्या महत्वाच्या विधेयकांची चर्चा या अधिवेशनात अपेक्षित आहे. राज्यसभा सकाळी 9 ते 1 आणि लोकसभा दुपारी 3 ते 7 अशा दोन सत्रांमध्ये हे कामकाज होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एका सभागृहाच्या कामकाजासाठी दोन सभागृहं वापरली जाणार आहेत. म्हणजे लोकसभेचे कामकाज सुरु असताना लोकसभेचे खासदार राज्यसभेतही बसलेले आढळलेले आढळतील. या अधिवेशनात सरकार एकूण 23 विधेयकं सादर करणार आहे. त्यापैकी 11 हे अध्यादेश आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात सरकारनं काही निर्णय लागू करण्यासाठी अध्यादेश काढले होते. जसं की कोरोना वॉरियर्स, डॉक्टर, नर्सेस, आशा वर्कर्स यांच्यावर कुणी हल्ला केल्यास त्याला अधिक कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.