नवी दिल्ली : केरळचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते पिनराई विजयन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत केलेल्या वक्तव्यावर ते संतापले आहेत. पिनराई विजयन म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळं इंडिया आघाडी मजबूत होत नाही तर यामुळं भाजपला फायदा होतो. इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी राजकीय विरोधक असल्यानं पिनराई विजयन यांची गळाभेट घेणार नाही, असं म्हटलं होतं.
पिनराई विजयन का संतापले?
पिनराई विजयन म्हणाले की, राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळं काही फरक पडत नाही की ते कोणाची गळाभेट घेतात. विजयन म्हणाले की राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेताना सर्वांनी पाहिलं आहे. मला मोदींची गळाभेट घेण्यावर आक्षेप नाही, मात्र, राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळं राजकीय संदेश जातो. यातून राहुल गांधी यांचा इंडिया आघाडीबाबतचा दृष्टिकोन दिसून येतो. या प्रकरणी अधिक विस्तारानं चर्चा होण्याची गरज असल्याचं माकप नेते पिनराई विजयन म्हणाले.
विजयन पुढं म्हणाले की माकपा नव्हे तर अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांच्या सारख्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी देखील बैठकीत काँग्रेसच्या भूमिकेविरोधात भाष्य केलं होतं. ते म्हणाले की, द्रमुकची सध्याची स्थिती काय आहे. विजयन पुढं म्हणाले की सध्याची स्थिती काँग्रेसची भूमिका प्रामुख्यानं राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळं निर्माण झाली आहे. इंडिया आघाडी सध्याच्या स्थितीत राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळं मजबूत होत नाही. तर, भाजपला फायदा होतो. भाजपला फायदा होणारी स्थिती राहुल गांधी यांच्याकडून निर्माण केली जात असल्याचं पिनराई विजयन म्हणाले.
केरळ विधानसभा निवडणुकीत पिनराई विजयन आणि राहुल गांधी यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. माकपचे महासचिव एम.ए. बेबी यांनी म्हटलं की केरळची राजकीय आणि सामाजिक स्थिती पाहता राहुल गांधी यांच्याकडून पिनराई विजयन यांची गळाभेट घेणं शक्य नाही. माकपचा महासचिव म्हणून मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहिलं होतं, त्यातील काही भाग माध्यमात आला होता, असं एम.ए. बेबी यांनी म्हटलं होतं.
वेगवेगळ्या राज्यातील स्थिती पाहता काही राज्यात इंडिया आघाडीतील घटकपक्ष काही राज्यात राजकीय विरोधक असू शकतात. त्यांचं राजकारण एकमेकांच्या विरोधात असू शकतं. माकपानं इंडिया आघाडी निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, राजकीय सभ्यता काय ठेवली पाहिजे, असं एम.ए. बेबी म्हणाले.
