नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीची आचारसंहिता लागू होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना मोदी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची कपात करण्यात आल्याची घोषणा केली. पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेल (Diesel Price) दोन रुपयांनी स्वस्त झाल्याने हा सामान्य नागरिक, वाहतूकदार आणि व्यावसायिकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू होणार आहेत.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी एक्स माध्यमावरुन याबाबतची घोषणा केली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांची कपात करुन देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, कोट्यवधी भारतीयांच्या आपल्या कुटुंबाची सुविधा आणि त्यांचे हित जपणे त्यांचे लक्ष्य आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाल्याने केंद्र सरकारला टीकेचे धनी व्हावे लागले होते. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी ओलांडल्याने त्याची बरीच चर्चा झाली होती. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारला अनेकदा लक्ष्यही केले होते. परंतु, आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट 2 रुपयांची कपात करुन मास्टरस्ट्रोक मारला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ किंवा घट झाल्यास सामान्य जनतेमध्ये त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत असतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्यास व्यावसायिक आणि वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळतो. या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांची कपात करण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने सरकारसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणारा ठरु शकतो. यावर आता विरोधक काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.
पेट्रोल
मुंबई - 104.2 रुपये (जुने दर - 106.31 रुपये)
कोलकाता - 103.94 रुपये (जुने दर - 106.3 रुपये)
चेन्नई - 100.75 रुपये (जुने दर - 102.63 रुपये)
नवी दिल्ली - 94.72 रुपये (जुने दर - 96.72 रुपये)
डिझेल
मुंबई -92.15 रुपये (जुने दर - 94.27 रुपये)
कोलकाता - 90.76 रुपये (जुने दर - 92.76 रुपये)
चेन्नई - 92.34 रुपये (जुने दर - 94.24 रुपये)
नवी दिल्ली - 89.62 रुपये (जुने दर - 83.62 रुपये)
आणखी वाचा
गॅस सिलेंडर स्वस्त, मग पेट्रोल-डिझेलही स्वस्त होणार का? सरकारची नेमकी भूमिका काय?
पेट्रोल गाडीत डिझेल अन् डिझेल गाडीत पेट्रोल भरलं तर...; 'गो मेकॅनिक' काय सांगतात?