नवी दिल्ली : केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष सत्राचे आज रात्री उशिरा सूप वाजलं. महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा सभापती जगदीप धनकड यांनी केली. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीदेखील कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करत असल्याचे म्हटले.
संसदेचे विशेष अधिवेशन हे 19 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान बोलावण्यात आले होते. सरकारने कोणताही अजेंडा जाहीर केला नव्हता. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. यामध्ये संसदेच्या जुन्या वास्तूमधून नव्या वास्तूमध्ये प्रवेश करण्यात आला. मंगळवारी विशेष अधिवेशनादरम्यान कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक मांडले होते. बुधवारी लोकसभेत दीर्घ चर्चेनंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले. मतदान प्रक्रिया स्लिपद्वारे पार पडली. ज्यामध्ये विधेयकाच्या बाजूने 454 आणि विरोधात 2 मते पडली. मतदानावेळी पंतप्रधान मोदीही सभागृहात उपस्थित होते. हे विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडण्यात आले. राज्यसभेत एकमताने महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले.
राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभा अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत हजेरी लावली. लोकसभेत पंतप्रधान दाखल झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज स्थगित होत असल्याची घोषणा लोकसभा अध्यक्षांनी केली.
गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर नव्या संसद भवनात कामाचा शुभारंभ झाला. पंतप्रधान मोदींनी (PM Modi) नव्या संसदेत सर्व खासदारांना संबोधित केलं. तसेच, नव्या संसद भवनातून पंतप्रधान मोदींनी महिला आरक्षण विधेयकाची घोषणा केली. महिला आरक्षण विधेयकासंदर्भात केलेली घोषणा ही नव्या संसद भवनात मोदींनी केलेली पहिली मोठी घोषणा आहे.
महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) राज्यसभेतही एकमताने मंजूर झाले. लोकसभेत दोन सदस्यांनी विरोधात मतदान केले होते. मात्र, आज राज्यसभेने एकमताने हे विधेयक मंजूर केले. आता महिला आरक्षण विधेयकाचा कायदा तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेने एकमताने विधेयक मंजूर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून 140 कोटी भारतीयांचे अभिनंदन केले. नारी शक्ती वंदन कायद्यासाठी मतदान करणाऱ्या सर्व राज्यसभा खासदारांचे मी आभार मानतो. असा एकमुखी पाठिंबा खरोखरच आनंददायी असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "संसदेत नारी शक्ती वंदन कायदा मंजूर झाल्यामुळे, आम्ही भारतातील महिलांसाठी अधिक मजबूत प्रतिनिधित्व आणि सक्षमीकरणाच्या युगाची सुरुवात करत आहोत. हा केवळ कायदा नाही. आपल्या देशाची उभारणी करणाऱ्या असंख्य महिलांना ही श्रद्धांजली आहे. त्यांच्या योगदानामुळे भारत समृद्ध झाला आहे.