Pappu Yadav Niece Died: उत्तर प्रदेशातील वाराणसी-गोरखपूर महामार्गावर शुक्रवारी (21 फेब्रुवारी) कार आणि रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. सदर अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये खासदार पप्पू यादव (राजेश रंजन) यांच्या भाचीचाही (Pappu Yadav Niece Died) समावेश असल्याचं समोर आलं आहे. खासदार पप्पू यादव यांची भाची तिच्या कुटुंबासह कुंभमेळ्यावरून परतत असताना हा अपघात झाला. भाचीच्या निधनाची बातमी ऐकताच खासदार पप्पू यादव यांना अश्रू अनावर झाले.
खासदार पप्पू यादव यांच्या भाचीचे नाव डॉ. सोनी यादव (Soni Yadav Accident) आहे. सोनी यादव तिच्या काकू आणि इतरांसोबत कारने महाकुंभात स्नान करण्यासाठी गेली होती. कुंभमेळ्यातून परतताना वाराणसी-गोरखपूर महामार्गावर त्यांची कार रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकली. या अपघातात सोनी यादवसह चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये गायत्री देवी, विपिन मंडल आणि चालक सलाउद्दीन यांचा समावेश आहे. कारमधील आणखी एक व्यक्ती दीपक झा गंभीर जखमी झाला आहे आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कार ट्रकला धडकली अन्...-
कारमधील सर्व लोक बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील पलासी भागातील रहिवासी होते. महाकुंभात स्नान करून सर्वजण प्रयागराजहून परतत होता. डॉ. सोनी यादव त्यांच्या काकू, सहाय्यक, एक जाणकार एमआर आणि ड्रायव्हरसह महाकुंभात स्नान करून परतत असताना, त्यांची कार ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला.
गाडी चालकाला झोप लागल्याने अपघात-
प्राथमिक तपासात असे दिसून आले की चालक सलाउद्दीनला झोप येऊ लागली, त्यानंतर दीपक झा गाडी चालवू लागला. पण काही वेळाने वेगवान कार नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला ती धडकली. अपघाताची माहिती मिळताच कासिमाबाद क्षेत्र अधिकारी, सदर एसडीएम आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले.
कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात जेसीबी-ट्रॅक्टरची मदत-
कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने 3 तास बचाव कार्य करण्यात आले. स्थानिक लोकांनीही बचाव कार्यात मदत केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
