Jammu Kashmir Border Pakistan Firing : जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) ला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान (Pakistan) ने पुन्हा एकदा कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुवारी (26 ऑक्टोबर 2023) संध्याकाळी उशिरा, पाकिस्तानी सैन्याने बीएसएफ (BSF) च्या चौक्यांना लक्ष्य करत जोरदार गोळीबार सुरू केला. यावर भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानने अरनिया (Arnia) च्या सीमेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यामुळे नापाक पाकिस्तान कधी सुधारणार हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामुळे सीमालगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सीमेला लागून असलेल्या गावकऱ्यांना सुरक्षितेसाठी जवळच बांधलेल्या बंकरचा आसरा घ्यावा लागला.


पाकिस्तानकडून शस्रसंधीचं उल्लंघन


पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्रीपासून अरनिया सीमेवर गोळीबार सुरू केला. अद्यापही येथे गोळीबार सुरु आहे. सीमाभागत सध्या गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत. अरनिया सेक्टरमधील ग्रामस्थांनी सांगितलं की, 'गुरुवारी रात्री उशिरापासून हा गोळीबार सुरू आहे, आमच्या गावापासून दीड किलोमीटर अंतरावर ही सीमा आहे, दोन - तीन वर्षांनी अशी घटना घडत आहे. संपूर्ण गावाने बंकरमध्ये आसरा घेतला आहे. काय होणार हे कोणालाच माहीत नाही.'






जम्मू काश्मीरमधील पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार केला आहे. अरनिया सेक्टरमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या बेछूट गोळीबारात बीएसएफचे दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.






अरनिया सेक्टरमधील ग्रामस्थांची प्रतिक्रिया


अरनिया सेक्टरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने सांगितलं की, 'गुरुवारी रात्री 8 वाजता गोळीबार सुरू झाला. सर्वत्र जोरदार गोळीबार सुरू होता. सुमारे 4-5 वर्षांनी हा प्रकार घडला. प्रत्येकजण आपापल्या घरात आहे. आमच्या गावात लग्न होत होते, सगळे तिकडे गेले होते, जेव्हा गोळीबार सुरू झाला तेव्हा आम्ही लोकांना सांगितले की जिथे आहात तिथेच राहा, सध्या सगळे आपापल्या घरात लपले आहेत.' या गोळीबारादरम्यान बीएसएफने सांगितलं की, आम्ही त्यांनी केलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहोत. पाकिस्तानकडून हा अचानक गोळीबार का केला जात आहे, याबाबत कारण समोर आलेलं नाही.