मुंबई : राफेल... हे नाव ऐकूनच पाकिस्तानची भंबेरी उडते. पाकिस्तानी सरकारमधले झाडून सगळे मंत्री राफेलवरून (Rafale Aircraft) बेताल बडबड करत आहेत. खरंतर ते आपली भीती लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. आकाशातलं ब्रह्मास्त्रं म्हटलं जाणारं राफेल प्रत्येक ऋतूसाठी आणि प्रत्येक मिशनसाठी तयार असतं. राफेलचा पाकिस्ताननं कसा धसका घेतलाय, त्याचा हा स्पेशल रिपोर्ट पाहुया.

राफेल... हे केवळ एक लढाऊ विमान नाही तर शत्रूंचा कर्दनकाळ आहे. भारताची ती ताकद आहे ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. भारतीय वायू दलाचं अभेद्य कवच, ज्याच्या ताकदीसमोर पाकिस्तानसारख्या देशांची पाचावर धारण बसेल. 

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीची लाट पसरलीय. केवळ चेहरे बदलतायत, पण सरकारमध्ये बसलेले झाडून सगळे मंत्री भारताला उत्तर द्यायची वल्गना करतायत. पण पाकिस्तान काय उत्तर देणार? केवळ राफेलचं नाव ऐकूनच पाकिस्तानची बोबडी वळते. 

युद्ध झाल्यास इंग्लंडला पळून जाऊ

खरंतर भारताचं लढाऊ विमान राफेलचं पाकिस्तानकडे कोणतंच उत्तर नाही. त्यामुळे पाकिस्तानचे नेते बेताल बडबड करतायत. पाकिस्तानच्या संसदेलाच आपल्या देशाच्या लष्करावर विश्वास नाही. युद्धाची वेळ आल्यास इंग्लंडला पळून जाऊ, असं खासदार असलेले शेर अफजल म्हणतात. 

पाकिस्तान सरकार आणि लष्कर घाबरलंय. कारण युद्ध झाल्यास भारतीय लष्कराला पाठिंबा देऊ, अशी घोषणा खैबर पख्तूनख्वामधील मशिदींतून केलीय जातेय.

भीती लपवण्यासाठी आणि जगासमोर प्रपोगंडा करण्यासाठी पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय मीडियाला घेऊन नियंत्रण रेषेवर पोहोचले. पाकिस्तान घाबरलाय... कारण पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत लवरकच काहीतरी मोठं पाऊल उचलेल, असे संकेत भारत सरकारकडून दिले जात आहेत. 

पाकिस्तानची भंबेरी उडाली 

भारतीय हवाई दलानं उत्तर प्रदेशातल्या गंगा एक्स्प्रेस वेवर 2 मे रोजी आपल्या लढाऊ विमानांचं लँडिंग केलं. ते दृश्य पाहून पाकिस्तानची भंबेरी उडालीय. राफेल, सुखोई, मिराज, मिग 29 आणि जग्वारसारख्या लढाऊ विमानांच्या गर्जनेमुळे पाकिस्तानच्या कानठळ्या बसल्या असतील. 

भारताच्या हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानातल्या शहरांशहरांमध्ये सायरन लावले जातायत. राफेलच्या ताकदीचा अंदाज सगळ्या जगाला असल्यानं पाकिस्तान घाबरणं साहजिकच आहे. हे डबल इंजिनवालं मल्टिरोल फायटर जेट फ्रान्समध्ये तयार झालं आणि भारतीय हवाईदलाचा गौरव बनलं. 4.5 जनरेशनच्या फायटर जेटमध्ये सहभागी असलेल्या राफेलसमोर जगातलं कोणतंही लढाऊ विमान टिकू शकत नाही. 

आकाशातील सिंह

राफेलला आकाशातला सिंह म्हटलं जातं. कारण राफेल तासाला 2,130 किलोमीटर वेगानं उड्डाण करण्यासाठी सक्षम आहे. एका मिनिटांत 60 हजार फूट उंचीवर ते पोहोचू शकतं. राफेल 3,700 किलोमीटर दूरपर्यंत वार करू शकतं आणि सलग 10 तास हजारो फूट उंचीवर शत्रूच्या नाकात दम आणू शकतं. 

राफेलचं वैशिष्ट्य म्हणजे ते फारच थोड्या जागेत लँड करू शकतं. 9.5 टन वजन घेऊन उड्डाण करू शकतं. राफेलवरची रडार यंत्रणा एकावेळी 40 टार्गेट ओळखू शकतं.  राफेलमध्ये हवेतल्या हवेत मारा करणारं मिटिओर मिसाईल तैनात आहे, जे 200 किलोमीटरपर्यंत शत्रूला नेस्तनाबूत करू शकतं. SCALP क्रूज मिसाइलद्वारे राफेल ज़मिनीवर 300 किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करू शकतं. 

कोणत्याही वातावरणात लढाईसाठी सज्ज

धुळीचे लोट असोत किंवा मुसळधार पाऊस... राफेलला उड्डाणापासून कुणीही रोखू शकत नाही. राफेल 360 अंश म्हणजेच चोहोबाजूला नजर ठेवू शकतं. विमानात ऑक्सिजन जनरेशन यंत्रणा आहे. म्हणजेच उंच उड्डाणावेळी ते थकत नाही. अफगानिस्तानपासून सीरिया आणि इराकच्या रणभूमीपर्यंत राफेलनं आपल्या पराक्रमाची चुणूक दाखवली आहे. 

2020 मध्ये राफेल भारतात आलं आणि हवाई दलात सहभागी झालं. तेव्हा पाकिस्तानच नाही तर चीनलाही धक्का बसला होता. राफेल हे स्वसंरक्षणासाठी आहे, पण कुणी वार करेल त्याला उत्तरसुद्धा दिलं जाईल, असं भारतानं तेव्हाही स्पष्ट केलं होतं.

आठ मिनिटात लाहोर गाठेल 

पाकिस्तानला राफेलची भीती वाटते कारण युद्धाची वेळ आली तर राफलेला लाहोर गाठायला केवळ आठ मिनिटं लागतील. इस्लामाबादपर्यंतच अंतर राफेल केवळ 14 मिनिटांत कापेल आणि कराचीला पोहोचायला राफेलला 32 मिनिटं लागतील. 

राफेल अण्वस्त्रं न्यायलासुद्धा सक्षम आहे. त्यामुळे त्याचा दरारा आणि शत्रूची भीती दोन्ही एकाचवेळी वाढतात. पाकिस्तान राफेलला यासाठीही घाबरतो कारण त्याच्याजवळ जेएफ 17 आणि जुने एफ 16 फायटर जेट आहेत. जे राफेलच्या आसपाससुद्धा फिरकू शकत नाहीत. त्यामुळे हवेत वेगानं संचार करणारा हा वायूवीर पाकिस्तानसाठी कर्दनकाळ आहे. राफेलला पाकिस्तान घाबरतो, यातूनच त्याच्या ताकदीची चुणूक मिळते.