Sukesh Chandrashekhar: मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखरने मोठा दावा केला आहे. आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना 10 कोटी रुपये 'प्रोटेक्शन मनी' म्हणून दिले असल्याचे चंद्रशेखरने म्हटले आहे. त्याच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातून दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना पत्र लिहून हे आरोप लावले.  या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्याने केली आहे. 


सुकेश चंद्रशेखरने नायब राज्यपालांना लिहिलेल्या पत्रानुसार, सत्येंद्र जैनने पैसे देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. या दबावामुळे दोन-तीन महिन्याच्या कालावधीत माझ्याकडून 10 कोटींची रक्कम वसूल करण्यात आली. ही सगळी रक्कम सत्येंद्र जैन यांचे कोलकातामधील निकटवर्ती असलेल्या चतुर्वेदी यांच्याकडून वसूल करण्यात आली होती. चतुर्वेदी मा र्फत मी सत्येंद्र जैनला 10 कोटींची रक्कम दिली असल्याचा दावा सुकेशने पत्रात केला आहे. 


सुकेशने म्हटले की, सत्येंद्र जैन मागील सात महिन्यांपासून तिहार तुरुंगात आहे. त्याने मला तुरुंग प्रशासनाच्या माध्यमातून धमकी दिली. मी हायकोर्टात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला. त्यासाठी त्रास देत धमकी देण्यात आली असल्याचे सुकेशने सांगितले. 


सुकेश चंद्रशेखरने सांगितले की, मला 2017 मध्ये अटक करण्यात आली. मी तिहार तुरुंगात होतो, त्यावेळी जैन हे तुरुंग मंत्री होते. ते अनेकदा तुरुंगात आले आणि माझ्यावर दबाव टाकला. तपास यंत्रणांना मी दिलेल्या देणगीबाबत कोणतीही वाच्यता न करण्याचे त्यांनी सांगितले. 


पत्रात चंद्रशेखरने पुढे म्हटले की,  2019 मध्ये सत्येंद्र जैन पुन्हा तुरुंगात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सचिव आणि मित्र सुशील हे देखील सोबत होते. सत्येंद्र जैन यांनी माझ्याकडून दरमहा दोन कोटी रुपये प्रोटेक्शन मनी म्हणून मागितले होते. जेणेकरून तुरुंगात मी सुरक्षितपणे वास्तव्य करू शकतो आणि तुरुंगात सुविधा मिळतील. 


'आप'ला 50 कोटीहून अधिक देणगी


सुकेश चंद्रशेखरने आपली सत्येंद्र जैनसोबत 2015 पासून ओळख असल्याचा दावा केला आहे. आम आदमी पक्षाकडून दक्षिण भारतात महत्त्वाचे पद दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. आम आदमी पक्षाला 50 कोटींहून अधिकची देणगी दिली असल्याचे सुकेश चंद्रशेखरने म्हटले. आम आदमी पक्षाने आपल्याला राज्यसभेची उमेदवारी देणार असल्याचे आश्वासन दिले होते, असा दावाही सुकेश चंद्रशेखरने केला आहे.