India Vs Pakistan War: जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारतासोबत वाढत्या तणावादरम्यान, पाकिस्तान आता मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानने 57 देशांच्या गट ओआयसी म्हणजेच इस्लामिक सहकार्य संघटनेने पाकिस्तानला पाठिंबा देण्याचे म्हटले आहे. अलिकडेच पाकिस्तानने दक्षिण आशियातील ताज्या परिस्थितीबद्दल ओआयसीला माहिती दिली होती. त्यावेळी भारताने केलेल्या कृतींना या प्रदेशाच्या शांततेसाठी 'गंभीर धोका' म्हणून वर्णन करण्यात आले होते.

न्यू यॉर्कमध्ये झालेल्या ओआयसी राजदूतांच्या बैठकीत पाकिस्तानने दक्षिण आशियाच्या मुद्द्यावर भाष्य केले. संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताने घेतलेले निर्णय 'अत्यंत चिथावणीखोर, राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि बेजबाबदार' होते. त्यांनी ओआयसीच्या सदस्य देशांना भारताची भूमिका आणि त्याचे परिणाम विचारात घेण्याचे आवाहन केले आहे.

द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, ओआयसी राजदूतांनी पाकिस्तान आणि त्यांच्या जनतेसाठी एकता आणि पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. त्यांनी राजनैतिक संवादाद्वारे तणाव कमी करण्याचे आणि प्रादेशिक तणावाचे मूळ शोधण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीर वादाचा विशेष उल्लेख केला. वृत्तानुसार, राजदूतांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि ओआयसीच्या ठरावांच्या आधारे काश्मीर प्रश्नाचे शांततापूर्ण निराकरण करण्याबद्दल चर्चा केली आहे.

पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी  काल (गुरुवारी) सुरक्षा परिस्थितीवर चर्चा केली आणि "कोणत्याही आक्रमणाला योग्य प्रत्युत्तर देण्याचा" संकल्प देखील व्यक्त केला. 22 एप्रिल मंगळवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर दोघांमधील ही पहिलीच बैठक होती.

नेत्यांनी सांगितले की, 'पाकिस्तान एकजूट आहे आणि त्याच्या सशस्त्र दलांसोबत उभा आहे, जे कोणत्याही धोक्याला किंवा आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहेत.' रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तानुसार, शरीफ यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-सानी यांच्याशीही फोनवरून चर्चा केली.चर्चेदरम्यान, त्यांनी दहशतवादी हल्ल्याच्या 'पारदर्शक' तपासासाठी सहकार्याची मिळण्याची भावना व्यक्त केली आहे.

 भारताने कडक शब्दात फटकारले  

इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (ओआयसी) व्यासपीठाचा गैरवापर केल्याबद्दल भारताने पाकिस्तानवर टीका केली. काल (गुरूवारी) संध्याकाळी नवी दिल्लीत माध्यमांना माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, ही इस्लामाबादची जुनी सवय आहे आणि नवी दिल्लीने नियमितपणे त्याविरुद्ध आवाज उठवला आहे आणि ओआयसीमधील मित्र आणि भागीदारांसमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी पुढे बोलताना म्हटलं की, ओआयसीमध्ये पाकिस्तान ज्या खोडसाळपणा करतो त्याबद्दल एक विशिष्ट मत आहे, जे इतर सदस्य राष्ट्रांमधील सहकारी आणि मित्रांमध्ये समान आहे. भारत आपले विचार सामायिक करत राहील आणि पाकिस्तानने नेहमीच केलेल्या या प्रयत्नांबद्दल त्याचे नेमके काय मत आहे हे त्यांच्या लक्षात आणून देईल.

पाकिस्तानची परिस्थिती बिकट

पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि अंतर्गतरित्या विभाजित आहे. कोणत्याही प्रकारच्या लष्करी संघर्षाला हाताळण्याच्या स्थितीत ते नाहीत. असे असूनही, ते सोशल मीडिया आणि काही देशांतर्गत मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे खोट्या लष्करी तयारीचा प्रचार करत आहे. अलिकडेच, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर नियंत्रण रेषेवरील आघाडीच्या रेषांची पाहणी करतानाचा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता, जो सोशल मीडियावर 2022 मधील जुना फुटेज म्हणून फेटाळण्यात आला होता. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने याला जाणीवपूर्वक केलेला प्रचार म्हटले आहे. भारताने म्हटले आहे की, पाकिस्तानमधील जनतेचा कमी होत चाललेला विश्वास हाताळण्याचा हा केवळ एक प्रयत्न आहे.