Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack ) सुरक्षा दलांनी कारवाईला सुरुवात केली आहे. सुरक्षा दलांनी खोऱ्यातून 1500 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) किंवा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लोकांचा समावेश आहे. पहलगाममध्ये काल दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेतजण जखमी झाले आहेत.
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या भागातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. हल्ल्यानंतर सीमावर्ती राज्य पंजाबनेही सुरक्षा वाढवली आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (23 एप्रिल 2025) घटनास्थळी भेट दिली. घनदाट पाइनच्या जंगलांनी वेढलेल्या लोकप्रिय पर्यटन स्थळी दहशतवादी ज्या मार्गाने पोहोचले असावेत, त्या घटनांचा क्रम आणि संभाव्य मार्गांबाबतही गृहमंत्र्यांना माहिती देण्यात आली आहे. हे ठिकाण श्रीनगरपासून 110 किलोमीटर अंतरावर आहे.
हल्ल्यातील दहशतवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. धर्माच्या आधारे पर्यंटकांची हत्या करणे, निर्दोषांना ठार करणे हे कृत्य निंदनीय आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाणार अशा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला. या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांसोबतच पडद्यामागे जे कोणी यामध्ये सहभागी असतील त्यांना संपवलं जाईल असंही राजनाथ सिंह म्हणाले.
दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे काल (22 एप्रिल) पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 28 जणांचा मृत्यू झालाय. या हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत. दरम्यान, राज्यातील अनेक पर्यटक तिथे पर्यटनासाठी गेले होते. या घटनेनंतर या सर्व पर्यटकांना पुन्हा महाराष्ट्रात यायचटं आहे. या सर्व पर्यटकांना राज्यात आणण्याची व्यवस्था राज्य सरकार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या: