नवी दिल्ली : देशात कोरोनाचं संकट अधिक गडद होत चाललं आहे. भारतात झपाट्यानं वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. अशात देशभरात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरसारख्या औषधांचा तुटवडा आहे. ऑक्सिजन पुरवण्यावर सध्या सरकारचा जोर असून देशभरात ऑक्सिजन वाहतुकीवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. ऑक्सिजन वाहतुकीवर कुठलेही निर्बंध घालू नका, असे सांगतOxygen वाहतुकीसाठी केंद्रानं नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
राज्य सरकार तसेच परिवहन अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय ऑक्सिजनच्या हालचालींवर कोणतेही बंधन घालण्यात येणार नाही. त्यानुसार ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी स्वतंत्र आंतरराज्यीय वाहतुकीस परवानगी द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. कोणतंही प्राधिकरण ठरवून दिलेल्या जिल्ह्यात किंवा भागात जाणाऱ्या ऑक्सिजन वाहनांना अन्य कोणत्याही विशिष्ट जिल्ह्यात किंवा भागात विशिष्ट पुरवठा करण्यासाठी संलग्न करू शकत नाही, असं केंद्रीय गृहमंत्रालयानं सांगितलं आहे.
राज्य सरकारकडून ऑक्सिजन वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा
ऑक्सिजनचा साठा विथाअडथळा विविध शहरात पोहोचावा यासाठी राज्य सरकारने नुकताच ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे. तसेच या वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना संकटात औषधांसह ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला अन्य राज्यातून ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आहे. परराज्यातून येणारी तसंच राज्यांतर्गंत ऑक्सिजन वाहन गाड्यांची वेगवान वाहतूक होऊन सर्वसामान्यांना वेळेत ऑक्सिजन मिळावा यासाठी सरकारने ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या गृह विभागानं काढले आहेत. यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या गाड्यांचा टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
24 तासात सव्वा तीन लाख कोरोनाबाधितांची नोंद
भारतातील वाढणाऱ्या रुग्णसंख्येनं जगभरातील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. जगभरात पहिल्यांदाच एका दिवसात सव्वा तीन लाख कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 314,835 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2104 रुग्णांनी जीव गमावला आहे. दरम्यान, 178,841 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी देशात 295,041 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. दरम्यान, यापूर्वी अमेरिकेत 8 जानेवारी रोजी एका दिवसांत सर्वाधिक तीन लाख सात हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली होती.