लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील दारुण परभावानंतर यादव कुटुंबातील धाकट्या सूनबाई अपर्णा यादव काहीशा नाराज असल्याचं दिसत आहे. “ईव्हीएममुळे माझा पराभव झाला नाही, तर स्वकीयांनीच पराभूत केलं.”, असं अपर्णा यादव म्हणाल्या. त्यामुळे अपर्णा यादव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.


अपर्णा यादव म्हणाल्या, “आपल्याच माणसांनी दुखावल्यावर अधिक त्रास होतो. कधी कधी पराभवही खूप काही शिकवून जातो. या परभवातून मला असा चष्मा मिळाला आहे, ज्यामध्ये ‘आपले’ आणि ‘परके’ यांची ओळख होऊ शकते.”

मुलायमसिंह यादव यांच्या सूनबाई अपर्णा यादव यांनी उत्तर प्रदेशातील पराभवाचं वर्णन शायरीतून केलं आहे. ‘कश्तियां वहां आकर डूब गईं जहां साहिल करीब था’, असे म्हणत अपर्णा यादव यांनी स्वकीयांवरच निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेश निवढणुकीत भाजपच्या रीता बहुगुणा जोशी यांनी लखनौ कँट मतदारसंघातून अपर्णा यादव यांचा 33 हजार मतांनी पराभव केला. मुलायमसिंह यादव यांनी स्वत: लोकांना आवाहन करुन, अपर्णा यादव यांना विजयी करण्याची विनंती केली होती. मात्र, तरीही अपर्णा यादव यांचा दारुण पराभव झाला.