मुंबई : भारताला शेजार असा मिळाला आहे की डोळ्यात तेल टाकून सीमेवर लक्ष द्यावं लागतं. पाकिस्तान आधी अमेरिकेच्या आणि आता चीनच्या मदतीने नवीन युद्ध तंत्र मिळवत राहिला, जिहादी दहशतवाद्यांना पुरवत राहिला. त्याला तोड देण्यासाठी भारतानेही आपल्या ताफ्यात नवं नवे क्षेपणास्त्र वाढवले आहेत. त्यातीलच स्काल्प, ब्राह्मोसचा वापर ऑपरेशन सिंदूरमध्ये कऱण्यात आला. विध्वसंक हॅमर बॉम्ब तसंच आत्मघातकी ड्रोन्सची त्याला साथ मिळाली. ऑपरेशन सिंदूरमध्ये काय होता स्काल्प (SCALP) आणि ब्राह्मोसचा (BrahMos) वाटा पाहुयात.
भारतीय सेनेपासून तुम्ही पळू शकता पण तुम्ही लपू शकत नाही ही गोष्ट जिहादी दहशतवाद्यांना चांगलीच कळली असेल. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 ठिकाणच्या दहशतवादी पाठशाळा भारतीय वायूसेनेनं बेचिराख करुन टाकल्या आहेत.
सीमेपासून 100 किमी आतमध्ये भारताची कारवाई
ऑपरेशन सिंदूरसाठी निवडलेले जिहादी अतिरेक्यांचे काही अड्डे सीमारेषेपासून 8-10 किलोमीटर आत होते. तर बहावलपूरसारखे काही थेट पाकिस्तानच्या 100 किलोमीटर आत... यावरुन ऑपरेशन सिंदूर किती खडतर, किती अवघड, किती धाडसी आणि किती घातक होतं याची कल्पना येईल.
भारतीय वायुसेनेनं लष्कर आणि नौदलासोबत अत्यंत उत्तम समन्वय राखत दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आकांना खोलवर जखम दिली आहे. दहशतवादाच्या फॅक्टरीत घुसून असा हल्ला करणं शक्य झालं ते दोन क्षेपणास्त्रांमुळे. त्यातलं एक होतं ब्राह्मोस तर दुसरं होतं स्काल्प.
SCALP Missile : स्काल्प क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य
- सर्वाधिक प्रभावी क्षेपणास्त्रांपैकी एक.
- प्रीसिजन स्ट्राईकसाठी स्काल्प अतिशय उत्तम.
- 1300 किलो वजनाची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता.
- युरोपियन डिफेन्स कंपनीकडून स्काल्पची निर्मिती.
- इराक, लिबिया, सिरीयानंतर पाकिस्तानात वापर.
- भारतानं राफेल विमानांमधून स्काल्प क्षेपणास्त्र जिहादी पाठशाळांवर डागले.
ब्राह्मोसची महती (BrahMos Missile) तर पाकिस्ताननेही मान्य केली आहे. सुखोई 30 एमकेआय विमानातून ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा पिनपॉईंट वापर करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्या ब्राह्मोसची काही वैशिष्ट्यं पाहुयात
- सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र.
- ध्वनीच्या वेगाच्या 3 पट गती.
- जमीन, पाणबुडी, जहाज आणि लढाऊ विमानातून डागता येतं.
- अचूकतेने शत्रूच्या रडारवर न दिसता लक्ष्य भेदण्यास सक्षम.
- जलद गतीमुळे शत्रूला प्रतिसाद देण्याची संधी कमी मिळते.
- भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलात वापरलं जातं
1965 असो किंवा 1971... भारतीय वायुसेनेनं आपलं वर्चस्व पाकिस्तानला दाखवून दिलं आहे. बालाकोट हवाई हल्ला असो किंवा ऑपरेशन सिंदूर, आपली हद्द न ओलांडता, मर्यादा न सोडता जिहादी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करुन शकतो ही वायुसेनेची ताकद आहे. गेल्या 50 वर्षात भारताने आपली संरक्षण सिद्धता आणखी वाढवली आहे. स्काल्प आणि ब्राह्मोसच्या रुपाने या शक्तीचं रुप पाकिस्तानसोबत जगाला पुन्हा पाहायला मिळालं.