नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकल्याचं दिसतंय. हडबडलेल्या पाकिस्तानच्या सैन्याने आता सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं (Pakistan Violates Ceasefire) आणि भारतीय सैन्यावर गोळीबार केला. त्यामध्ये दहा भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये 10 पाकिस्तानी जवान ठार झाले आहेत. 

पहलगाम हल्ल्याचा बदला घेऊन भारताने पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. त्यानंतर सीमेवर परिस्थिती चिघळू नये अशी इच्छा आहे. परंतु पाकिस्तानने तणाव वाढवला तर त्याला निर्णायक उत्तर देणार असल्याचं भारताने आधीच स्पष्ट केलंय. आताही सीमेवर पाकिस्ताने केलेल्या गोळीबाराला उत्तर देताना भारताने पाकिस्तानच्या 10 जवानांना ठार केलं आहे. 

India Operation Sindoor : भारताने बदला घेतला

भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला असून पाकिस्तानात 100 किमी आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण केलं. दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली. 

या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष्य साधलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.

Pahalgam Terror Attack Revenge : राफेलने स्काल्प मिसाईलचा मारा केला

पाकिस्तानची 9 लक्ष्य बेचिराख करण्यासाठी भारताने राफेल आणि सुखोई 30 एमकेआय या विमानांचा वापर केला. राफेल विमानांनी अत्याधुनिक स्काल्प मिसाईल्स डागली. अतिदूरच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी स्काल्प ही क्षेपणास्त्र वापरण्यात आली. 

स्काल्प क्षेपणास्त्रांद्वारे 500 किमी अंतरावरील लक्ष्यांचा वेध घेतला जातो. एक हजार किमी प्रतीतास या वेगाने स्काल्प मिसाईल्स मारा करतात. विशेष म्हणजे शत्रूच्या रडारवर दिसत नसल्याने स्काल्प मिसाईल्स आली तरी पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम कार्यान्वितच झाली नाहीत. त्यामुळे पाकिस्तान ज्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या वल्गना करत होता त्या फोल ठरल्या. 

चीन आणि भारताची चर्चा 

भारताच्या कारवाईनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात चर्चा झाली. पाकिस्तानकडून अतिरेक झाला तर उत्तर देण्याची आमची तयारी आहे असं भारताने चीनला स्पष्ट सांगितलं. परिस्थिती चिघळावी अशी भारताची इच्छा नाही. पण जर पाकिस्तानने तणाव वाढवला तर आमची निर्णायक उत्तर देण्याची तयारी आहे असं डोवाल यांनी वांग यी यांना सांगितलं. 

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी विविध देशांच्या एनएसएसोबत चर्चा केली. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, सौदीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत डोवाल यांची चर्चा झाली. यूएई, जपानच्याही अधिकाऱ्यांशीही संवाद साधला. यावेळी पाकिस्तानवर केलेल्या कारवाईची डोवाल यांनी माहिती दिली.