Operation Mahadev : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला होता. या भ्याड हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. आता जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 97 दिवसांनंतर अखेर भारतीय सैन्याला मोठे यश मिळाले आहे. ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत भारतीय सैन्याने प्रत्युत्तरात्मक कारवाई करत तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ही चकमक सोमवारी श्रीनगरमधील लिडवास परिसरात झाली. याबाबत चिनार कॉर्प्सने माहिती दिली असून, ही कारवाई हलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी नेटवर्कविरोधात करण्यात आल्याचे सांगितले आहे.
पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवादी ठार
सूत्रांच्या माहितीनुसार, सुलेमान, यासिर आणि अली या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. त्यापैकी सुलेमान आणि यासिर हे पहलगाम हल्ल्यात सामील होते, अशी माहिती समोर आली आहे. तथापि, सैन्याच्या वतीने यासंदर्भात अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. सध्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू असून, आज संध्याकाळपर्यंत प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती देण्यात येईल, असे सैन्याने स्पष्ट केले आहे.
लष्कराने काय म्हटले?
श्रीनगरमधील दाचिगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवन परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाल्याची माहिती लष्कराने दुपारी 12:30 वाजता दिली. लष्कराच्या चिनार कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर लिहिले की, "ऑपरेशन महादेव - 'जनरल एरिया लिडवास' मध्ये संपर्क स्थापित झाला आहे." दुपारी 1:30 वाजता लष्कराने सांगितले की तीन दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हरवनच्या मुलनार भागात कारवाई सुरू केली होती.
हत्यारांचा मोठा साठा जप्त, परिसरात कडक बंदोबस्त
चकमकीनंतर दहशतवाद्यांकडून अमेरिकन M4 कार्बाइन, AK-47 रायफल, 17 रायफल ग्रेनेड आणि इतर संशयास्पद सामग्री जप्त करण्यात आली आहे. ऑपरेशननंतर परिसरात लष्कर आणि सुरक्षा दलांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे सकाळी शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. यादरम्यान दोन वेळा गोळीबाराचा आवाज आला, त्यानंतर सुरक्षादलांनी परिसराला पूर्ण वेढा घालून दहशतवाद्यांचा खात्मा केला.
22 एप्रिलला बैसरन व्हॅलीत झाला होता हल्ला
22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. पहलगामपासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन घाटीमध्ये तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अचानक हल्ला चढवला. दहशतवाद्यांनी लोकांची धार्मिक ओळख विचारून पर्यटकांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 16 जण गंभीर जखमी झाले होते.
आदिल, मूसा आणि अली पहलगाम हल्ल्याचे तीन गुन्हेगार
घटनेनंतर दोन दिवसांनी, म्हणजेच 24 एप्रिल रोजी अनंतनाग पोलिसांनी तीन दहशतवाद्यांचे स्केच जारी केले होते.
आदिल हुसैन ठोकर (अनंतनागचा रहिवासी)
हाशिम मूसा ऊर्फ सुलेमान (पाकिस्तानी)
अली ऊर्फ तल्हा भाई (पाकिस्तानी)
या तिघांपैकी मूसा आणि अली हे पाकिस्तानमधील असून त्यांच्यावर प्रत्येकी 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. हाशिम मूसा हा पाकिस्तानच्या लष्करातील स्पेशल सर्विस युनिटचा प्रशिक्षित कमांडो असल्याचे मानले जाते. अलीकडेच NIA ने दोन संशयितांना अटक केली होती. मात्र, अटक केलेल्या आरोपींनी ज्या दहशतवाद्यांची नावं उघड केली, ते हेच तिघं होते की अन्य कोणी, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तरीही आतापर्यंतच्या तपासातून असे संकेत मिळत आहेत की, ऑपरेशन महादेव हे पहलगाम हल्ल्यास जबाबदार असलेल्या याच दहशतवादी मॉड्यूलविरुद्ध राबवण्यात आले आहे.
आणखी वाचा