Oommen Chandy Passes Away: केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओमन चांडी (Oommen Chandy) यांचं मंगळवारी (18 जुलै) निधन झालं. ते काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत भारत जोडो यात्रेतही दिसले होते. केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन आणि चांडी यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी त्यांच्या निधनाची माहिती दिली. काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ओमन चांडी हे 79 वर्षांचे होते.


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचं आज सकाळी निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर बंगळुरूमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या मुलानं सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. 2004-2006, 2011-2016 या कालावधीत त्यांनी केरळचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं.






केरळ काँग्रेस अध्यक्षांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला


केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन यांनी ट्वीट करून ओमन चांडी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चांडी यांचं निधन झाल्याचं त्यांनी ट्वीट केलं आहे. प्रेमाच्या बळावर जग जिंकणाऱ्या एका राजाच्या कथेचा मार्मिक शेवट झाल्याचं ट्वीटमध्ये लिहिण्यात आलं आहे. आज एका महापुरुषाच्या निधनानं मला अतिव दु:ख झालं आहे. त्यांनी असंख्य व्यक्तींच्या जीवनावर प्रभाव टाकला आणि त्यांचा वारसा कायम आपल्यासोबत राहील.


दीर्घकाळापासून होते आजारी 


ओमन चांडी हे बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याची माहिती मिळत आहे. 2019 पासून त्यांची प्रकृती खालावली होती. ओमन चांडी यांना घशाचा आजार झाल्यानं त्यांना उपचारासाठी जर्मनीला नेण्यात आलं होतं. 1970 पासून त्यांनी पुथुपल्ली मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. त्यांचे पुत्र चांडी ओम्मान यांनी मंगळवारी पहाटे 5 वाजता सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांच्या निधनाची माहिती दिली.


सलग 12 वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या


ओमन चांडी कोट्टायम जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पुथुपल्ली येथून निवडणूक लढवत होते. त्यांनी सलग 12 वेळा विधानसभा निवडणूक जिंकली. ते एक मास लीडर होते, तसेच, त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात आयोजित केलेल्या जनसंपर्क कार्यक्रमामुळे शेकडो लोकांच्या प्रलंबित तक्रारींचं त्वरित निराकरण करण्यात आलं.


के करुणाकरण आणि एके अँटोनी सरकारमध्ये भूषवलं मंत्रिपद 


के करुणाकरण आणि ए के अँटोनी सरकारमध्ये मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं आणि वित्त, गृह आणि कामगार खात्यांची जबाबदारी सांभाळली. चांडी यांना 2018 मध्ये AICC सरचिटणीस बनवण्यात आलं होतं. 2006 ते 2011 या काळात त्यांनी केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केलं. चांडी यांच्या पश्चात पत्नी मरियम्मा ओम्मान, मुलगा चांडी ओम्मान आणि मुली मारिया आणि अचू असा परिवार आहे.