नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापतीला एक वर्ष पूर्ण झालं आहे. मागील वर्षी 15 जून रोजी चीनच्या सैनिकांनी गस्तीच्या वेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय जवानांवर हल्ला केला होता. यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती.


या झडपेत भारताचे 20 सैनिक शहीद झाले होते, तर चीनने केवळ चार सैनिकांचा मृत्यू झाल्याचं कबूल केलं होतं. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर सध्या सीमेवर शांतता आहे आणि सैनिक मागे घेण्याचं काम सुरु आहे. पण विश्वासाचं वातावरण बनू शकलेलं नाही. कारण चीनने जेवढी आश्वासनं दिली त्याच्याविरोधात जाऊन कारवाई केली आहे.


गलवान झडपेनंतर भारताची सुरक्षा आणखी मजबूत झाली
एक अधिकाऱ्याने सांगितलं, "सैन्य म्हणून आम्ही अधिक सक्षम आहोत. गलवान खोऱ्यातील झडपेनंरत आम्हाला उत्तरेकडील सीमेवर राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य द्यावं याबाबत दृष्टिकोन मिळाला. चीननेही उंचावरील क्षेत्रातील अनेक भागात आपलं सैन्य वाढवल्याचंही आम्हाला समजलं.


सैन्याच्या तीन दलांमधील ताळमेळ वाढला
सूत्रांच्या माहितीनुसार, हिंसक झडप झाल्यानंतर भारतीय सैन्याच्या तीन दलांमधील ताळमेळ आणि एकजूट आणखी वाढली आहे. एलएसीवरील आव्हानांचा सामना करण्यासाठी सैन्य आणि नौदल एकीने काम करत आहे. "या झडपेनंतर सैन्य आणि नौदल यांच्यामधील ताळमेळ आणखी चांगला झाला आहे", असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.


भारत आता कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम
दोन्ही देशांमध्ये अजूनही विश्वास प्रस्थापित झालेला नाही. परंतु भारत पूर्व लडाख आण अन्य क्षेत्रात एलएसीजवळ कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. सैन्य आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्याने फेब्रुवारी महिन्यात पँगाँग तलावाच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील किनाऱ्यावरुन सैनिक आणि शस्त्र हटवण्याची प्रक्रिया पूर्ण केली. हिंसक झडपेनंतर इतर ठिकाणांहूनही सैनिकाना मागे घेण्याच्या प्रक्रियेवर बातचीत सुरु आहे.