मुंबई: मुस्लिम समाजामध्ये सुधारणेचं वारं आणणाऱ्या सर सय्यद अहमद खान यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1817 रोजी झाला. तसेच भारतीय चित्रपट सृष्ठीवर आपली छाप उमटवणाऱ्या स्मिता पाटील हिचाही आजच्याच दिवशी जन्म झाला होता. जाणून घेऊया आजचा दिवस इतिहासात कोणत्या घटनांचा साक्षीदार आहे,
1605- मुगल सम्राट अकबरचं निधन
तिसरा मुगल सम्राट अकबर याचं 17 ऑक्टोबर 1605 रोजी निधन झालं. अकबर हा धर्मनिरपेक्ष मुगल सम्राट म्हणून प्रसिद्ध होता.
1817- सर सय्यद अहमद खान यांचा जन्मदिवस
अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांचा आजच्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबर 1817 रोजी जन्म झाला. सर सय्यद अहमद खान हे मुस्लिम धर्मातील प्रमुख सुधारणावादी होते. त्यांनी मुस्लिम समाजातील पडदा पद्धतीला विरोध केला आणि मुस्लिम धर्मातील अनेक अनिष्ठ रुढीविरोधात आवाज उठवला. सर सय्यद अमहद खान यांनी अलिगढ या ठिकाणी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली. मुस्लिम समाजामध्ये केलेल्या सुधारणांमुळे ब्रिटिशांनी त्यांना सर ही पदवी दिली आणि त्यांचा गौरव केला.
1874- कोलकाता- हावडा ब्रिज वाहतुकीसाठी खुला
कोलकाता ते हावडा या दरम्यान हुगळी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाला 17 ऑक्टोबर 1874 रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. नंतरच्या काळात याच ठिकाणी प्रसिद्ध हावडा पुलाची निर्मिती करण्यात आली.
1906- स्वामी रामानंद तिर्थ यांचा जन्म
हैदराबाद मुक्ती संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या स्वामी रामानंद तिर्थ यांचा आज जन्मदिवस. स्वामी रामानंद तिर्थ यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1906 रोजी झाला. स्वामी रामानंद तिर्थ यांनी हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
1920- भारतीय कम्युनिस्ट पक्षाची ताश्कंद येथे स्थापना
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या पक्षाची स्थापना 25 डिसेंबर 1925 रोजी कानपूर या ठिकाणी झाली असल्याची माहिती आहे. पण काही जणांच्या मते, त्या आधीही म्हणजे 17 ऑक्टोबर 1920 रोजी म्हणजे कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या स्थापनेनंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाल्याचं सांगितलं जातंय. सुरुवातीला मानवेन्द्र नाथ राय, अबनी मुखर्जी, मोहम्मद अली आणि शफ़ीक सिद्दीकी हे कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते.
1955- स्मिता पाटील हिचा जन्मदिन
आपल्या अभिनयाने संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीवर छाप पाडलेल्या स्मिता पाटील हिचा आज जन्मदिन आहे. 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात तिचा जन्म झाला. स्मिता पाटीलने अनेक समांतर चित्रपटात काम केलं असून त्या माध्यमातून तिने रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. मंथन, भूमिका, आक्रोश, चक्र, चिदंबरम, मिर्च मसाला, उंबरठा हे तिचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
1970- अनिल कुंबळे याचा जन्मदिन
भारतीय स्पिनर अनिल कुंबळे याचा 17 ऑक्टोबर 1970 रोजी जन्म झाला. एकाच कसोटी डावात 10 बळी घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे.
1979- मदर टेरेसा यांना नोबेलच्या शांती पुरस्काराने सन्मानित
आजच्याच दिवशी 17 ऑक्टोबर 1979 रोजी मदर टेरेसा यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना नोबेलच्या शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. देशातील रंजल्या-गांजल्या लोकांची सेवा करण्यासाठी मदर टेरेसा (Mother Teresa) यांनी आपले जीवन समर्पित केलं. त्यांनी भारतात आपल्या कार्याची सुरुवात केली. मदर टेरेसा यांना 7 ऑक्टोबर 1950 रोजी मिशनरी ऑफ चॅरिटी या (Missionaries of Charity) संस्थेची स्थापना करण्यासाठी मान्यता देण्यात आली. मदर टेरेसा यांनी ही संस्था कोलकात्यात स्थापन केली आणि आपल्या समाजकार्याला सुरुवात केली. आज त्यांच्या या संस्थेच्या माध्यमातून देशभरात शेकडो अनाथालयं आणि रुग्णालयं कार्यरत आहेत. या माध्यमातून लाखो लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. मदर टेरेसा यांच्या या कार्याची दखल घेऊन 1979 साली त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. तर 1980 साली त्यांना भारतरत्न देण्यात आला.
1998- नायजेरियात स्फोट, हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू
नायजेरिया देशातील जेसी नावाच्या शहरात 17 ऑक्टोबर 1998 रोजी गॅस पाईप लाईनचा स्फोट झाला. त्यामध्ये 1,082 लोकांचा मृत्यू झाला.
2003- चीनने अंतराळात मानव पाठवला
17 ऑक्टोबर 2003 रोजी अंतराळात मानव पाठवण्यात चीनने यश प्राप्त केलं. अशी कामगिरी करणारा चीन हा आशियाती पहिला देश तर जगातील तिसरा देश ठरला.
2009- समुद्राखाली मालदीवची कॅबिनेट बैठक
जागतिक तापमानवाढीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी 17 ऑक्टोबर 2009 रोजी मालदिवमध्ये समुद्राखाली मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. जागतिक तापमानवाढीचा फटका समुद्रकिनारी असलेल्या लहान देशांना मोठ्या प्रमाणात बसत असून भविष्यात हे देश पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी मालदिवने ही बैठक समुद्राखाली आयोजित केलं आणि या समस्येकडे लक्ष वेधून घेतलं.