Coromandel Express Accident: 2 जून 2023... शुक्रवारी संध्याकाळी ओडिशातील (Odisha Train Accident) बालासोरमध्ये (Balasore) तीन ट्रेनची एकमेकांना धडकल्या आणि भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 270 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या रेल्वे दुर्घटनेनंतर संपूर्ण देश हळहळला. या अपघातात अनेकांचा बळी गेला. कोणी आपली आई गमावली, कोणी वडील, कोणी भाऊ, तर कोणी बहिण... एवढंच नाहीतर तर या अपघातग्रस्त रेल्वे रुळावर काही प्रेम कहाण्याही अधुऱ्या राहिल्यात... पाहुयात नेमकं काय प्रकरण आहे ते... 


ओडिशातील बालासोरमध्ये शुक्रवारी जिथे रेल्वे अपघात झाला तिथे अनेक अपघातग्रस्त रेल्वेचे डब्बे अस्थाव्यस्थ पडले होते. त्या ठिकाणी एकीकडे अपघातग्रस्त रेल्वेचे डबे, तर दुसरीकडे काही कागद अस्ताव्यस्त पडले होते. हे कागद नेमके कसले हा प्रश्न पडल्यानं उपस्थितांकडून हे कागद एकत्र करुन त्यावरुन मजकूर वाचण्यात आला. या कागदांवर बंगाली भाषेत काही कविता लिहिण्यात आल्या होत्या. हे कागद कोणा एका प्रवाशाच्या डायरीचे होते. 


अपघातग्रस्त रेल्वेंमधील कोणा एका प्रवाशानं डायरीच्या पानांवर मासे, सूर्य आणि हत्तींचं चित्र रेखाटक आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. असं म्हटलं जातंय की, अपघातग्रस्त रेल्वेतील प्रवाशांनी आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीसाठी सुट्टीच्या दिवसांत एक प्रेमपत्र लिहिलं होतं. पण खंत हिच आहे की, हे प्रेमपत्र आणि प्रेम कविता लिहिणाऱ्या प्रवाशाबाबत मात्र अद्याप कोणतीच माहिती उपलब्ध नाही. 




"मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहिन"


अपघातग्रस्त ठिकाणी सापडलेल्या कागदांवर बंगाली भाषेत काही ओळी लिहिल्या होत्या. "अल्पो अल्पो मेघ थेके हल्का ब्रिस्टी होय, छोटो चोटो गोलपो ठेके भालोबासा सृष्टि होय." याचा अर्थ असा होतो की, "मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहिन, तू माझ्या हृदयाच्या जवळ आहेस." अपघातग्रस्त ठिकाणी सापडलेली प्रेमाच्या कवितेची पानं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


ही पानं सांभाळून ठेवण्यात आलीत : रेस्क्यू ऑपरेशन टीम 


बचाव कार्यात सहभागी असलेले पथक आणि स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अपघातग्रस्त ठिकाणाहून सापडलेली कवितांची ही पानं जपून ठेवण्यात आली आहेत. आत्तापर्यंत कोणीही या कवितेशी किंवा तिच्या लेखकाशी संबंध असल्याचा दावा केलेला नाही. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही कविता कोणी लिहिली आहे, याबाबत कोणतीही माहिती नाही. 


दरम्यान, 2 जून रोजी ओडिशात झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला होता, तर 1000 हून अधिक लोक जखमी झाले होते. जखमींवर बालासोर ते कटक आणि भुवनेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.