Rations from ATM : आत्तापर्यंत ऑटोमेटेड टेलर मशीन (एटीएम) मधून पैसे तुम्ही काढले असतील. शिवाय या मशीनमधून तुमच्या खात्यात पैसे भरले देखील असतील किंवा चेक डिपॉझिटच्या वगैरे काही सुविधांच्या मशीनचा तुम्ही अनुभव घेतला असेल. पण आता एक अशी सुविधा सुरू होणार आहे, ज्याद्वारे तुम्ही एटीएममधून अन्नधान्य काढू शकणार आहात. 


ओडिशा सरकारने हा अनोखा आणि तितकाच महत्त्वपूर्ण उपक्रम प्रत्यक्षात आणला आहे. ओडिशा सरकार रेशन डेपोवर एटीएम मशीनप्रमाणे ऑल टाईम ग्रेन म्हणजेच एटीजी (ऑल टाइम ग्रेन) मशिनमधून रेशन देण्याची तयारी करत आहे. देशभरात  देखील लवकरच ही सुविधा सुरू होईल. 


पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्य देण्यासाठी एटीजी मशीनचा वापर केला जाईल. अन्न पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री अतानु एस. नायक यांनी ही माहिती दिली. एटीजी मशिन हे एटीएमप्रमाणे असतील, मात्र त्यांच्यामार्फत धान्य पुरवले जाईल असं नायक यांनी सांगितलं.


लाभार्थ्यांना विशेष कार्ड


सुरुवातीच्या टप्प्यात शहरी भागात ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे नायक यांनी सांगितले. सर्व प्रथम भुवनेश्वरमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि राज्य अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना सेवेचा लाभ घेण्यासाठी विशेष कार्ड दिले जाईल.


गुरुग्राममध्ये देशातील पहिले 'ग्रेन एटीएम'  


देशातील पहिले ग्रीन एटीएम गेल्या वर्षी हरियाणातील गुरुग्राममध्ये बसवण्यात आले होते. अन्न आणि पुरवठ्याची जबाबदारी असलेले हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले की, धान्याचे एटीएम बसवल्यानंतर सरकारी दुकानातून रेशन घेणार्‍यांचा वेळ आणि संपूर्ण मोजमाप यासंबंधीच्या सर्व तक्रारी दूर केल्या जातील. हे मशीन बसवण्याचा उद्देश "योग्य प्रमाणात योग्य लाभार्थी"  असल्याचं त्यांनी म्हटलं. याचा फायदा केवळ ग्राहकांनाच होणार नाही, तर सरकारी डेपोवरील धान्य टंचाईचा त्रासही संपुष्टात येईल, असे त्यांनी म्हटलं.