NCW Member Khushbu Sundar On Udupi Washroom Video Row: उडपीतील पॅरामेडिकल कॉलेजच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा बसवून मुलीचे प्रायव्हेट व्हिडीओ चित्रित केल्याची बातमी खोटी आहे, त्यात काहीही तथ्य नसून त्या अफवा आहेत असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर यांनी स्फष्ट केलं आहे.  या प्रकरणी कर्नाटकातील उडपीच्या पॅरामेडिकल गर्ल्स कॉलेजच्या तीन विद्यार्थीनींच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. तीन विद्यार्थ्यांशिवाय कॉलेज प्रशासनावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागताच खुशबू सुंदर यांनी या अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. 


या प्रकरणी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेणाऱ्या खुशबू सुंदर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, "मुलींच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा असल्याची बातमी सत्य नसून त्या अफवा आहेत. त्यासंबंधित खोटे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ही एक शैक्षणिक संस्था असून या ठिकाणी कोणतेही छुपे व्हिडीओ नाहीत. या संबंधित पोलिसांशी चर्चा सुरू आहे. पोलिसांचा या संबंधित अधिक तपास सुरू आहे, महिला आयोगही यावर तपास करत आहे. या संबंधित सत्य हे लवकरच समोर येईल."


 






संंबंधित घटनेला राजकीय रंग मिळत असल्याचं दिसून येतंय. गुन्हा नोंद झालेल्या तीन मुली या मुस्लिम असून त्यांनी हिंदू मुलीविरुद्धचा हा कट रचल्याचा आरोप हिंदूत्ववादी नेत्यांनी केला होता, तसेच यावरून राजकारणही तापवण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यानंतर आता त्यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर यांनी ही बातमी अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. 


दरम्यान, कर्नाटकातील 'नेत्र ज्योती इन्स्टिट्यूट ऑफ अलाइड हेल्थ सायन्सेस' या कॉलेजच्या शौचालयातील व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या संदर्भात पोलिसांनी स्वत:हून दखल घेऊन दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम 509, 204, 175, 34 आणि आयटी कायद्याच्या कलम 66 (E) अंतर्गत नोंदवलेल्या एफआयआरमध्ये तीन मुली आणि महाविद्यालयाच्या प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणाऱ्या घटनेशी संबंधित माहिती आणि पुरावे देण्यात अपयशी ठरल्याबद्दल पोलिसांनी प्रशासनावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.


ही बातमी वाचा: