मुंबई : आयआयटीच्या प्रवेश क्षमतेत पुढील तीन वर्षांमध्ये 30 हजारांपर्यंत वाढ करण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. आयआयटी कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
प्रवेश क्षमतेत वाढ केल्यामुळे बीटेकच्या 12 हजार जागा, तर 18 हजार पोस्ट ग्रॅज्युएशन आणि संशोधनविषयक अभ्यासक्रमांसाठी जागा निर्माण होणार आहेत. पण अजून कोणत्या आयआयटीमध्ये किती जागा वाढतील याबद्दल निर्णय झाला नसून, लवकरच तो घेण्यात येईल.
देशभरात सध्या 12 आयआयटी असून त्यात 72 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. 2020 पर्यंत ही संख्या 1 लाखांपर्यंत नेण्याची केंद्र सरकारची योजना आहे. शिवाय आयआयटीच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर अप्टीट्यूड टेस्ट घेण्याचा निर्णयही आयआयटी कौन्सिलने घेतला आहे.
आयआयटीच्या 1 हजार विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री फेलोशिपचा कार्यक्रमही सुरू करण्यात येणार आहे. यात बीटेक झालेल्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी फेलोशिप देण्यात येईल.