नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये एकमेकांच्या विरोधी विचारधारेच्या सरकारचा अखेर कडेलोट झाला. जम्मू काश्मीरमधील पीडीपी-भाजप सरकारचा संसार तीन वर्षातच मोडला. भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे पीडीपी नेत्या आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी राजीनामा दिल्याने, जम्मू काश्मीरमधील सरकार कोसळलं आहे.


भाजपने पाठिंबा काढण्याआधी राजधानी दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. पाठिंबा काढण्याची अधिकृत घोषणा करण्यापूर्वी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांची भेट घेतली. त्यानंतर भाजपच्या जम्मू-काश्मीरमधील नेत्यांची बैठक झाली आणि पाठिंबा काढून घेतल्याची घोषणा करण्यात आली.

काश्मीरमधील अशांततेच्या मुद्द्यावर चर्चा?

रमजान महिन्यात मेहबुबा मुफ्ती यांच्या मागणीनंतर गृह मंत्रालयाने शस्त्रसंधीचा निर्णय घेतला होता. या काळात तरी काश्मीर खोऱ्यात शांतता राहिल अशी अपेक्षा होती, मात्र याउलट घडलं. एका महिन्याच्या काळात 68 दहशतवादी हल्ले झाले, ज्यात अनेक जवान आणि नागरिक मारले गेले.

शस्त्रसंधी मागे

रमजान महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी केंद्रीय गृह मंत्रालयाने मागे घेतली आहे. केंद्र सरकारकडून ‘सस्पेंशन ऑफ ऑपरेशन’ या मिशनअंतर्गत 17 मे 2018 ला शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती.

याअंतर्गत दहशतवाद्यांविरोधात चालू असलेल्या ‘ऑपरेशन ऑलआऊट’ला स्थगिती देण्यात आली होती.

शस्त्रसंधी लागू असली तरी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर लष्कराकडून लगेच चोख प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. शस्त्रसंधी मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा  दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन ऑलआऊट’ सुरु करण्यात आलं आहे.

पीडीपीचा पाठिंबा काढताना राम माधव काय म्हणाले?

यावेळी राम माधव म्हणाले की,  मागील काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये ज्या घटना घडल्या, त्यावर माहिती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत सल्लामसलत केल्यानंतर आज आम्ही निर्णय घेतला की, युती सरकार चालवणं शक्य नाही.

मागील तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून आम्ही आमच्या बाजूने योग्यरित्या सरकार चालवण्याचा प्रयत्न करत होतो. राज्याच्या तीन प्रमुख भागांमध्ये विकास करण्याचा प्रयत्न करत होतो. पण सध्या राज्यात जी परिस्थिती आहे, त्यामध्ये दहशतवाद आणि हिंसाचाराचं प्रमाण अधिक आहे. फुटीरतावाद वाढला आहे. नागरिकांचा मूलभूत अधिकार आणि व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आहे, असं राम माधव म्हणाले.

संबंधित बातम्या :

काय आहे कलम 370? ते हटवल्यास काय होईल?

देशद्रोही युती तुटली, आम्हाला आनंद आहे- संजय राऊत

भाजपने पाठिंबा काढला, जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीचं सरकार कोसळलं

रमजान महिन्यातील शस्त्रसंधीत 68 दहशतवादी हल्ले

'ऑपरेशन ऑलआऊट' पुन्हा सुरु, काश्मीरमध्ये शस्त्रसंधी मागे