राजकोट : विम्याचे सव्वा कोटी रुपये मिळवण्यासाठी एका महिलेने दत्तक घेतलेल्या मुलाच्या हत्येचा कट रचला आणि त्यानंतर त्याची हत्या केली. गुजरातच्या राजकोटमध्ये ही घटना घडली आहे.


राजकोटमध्ये 8 फेब्रुवारी रोजी काही अज्ञातांनी 12 वर्षीय गोपाल अजानी या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता. पण हा प्रयत्न फसल्याने त्यांनी मुलावर सुऱ्याने वार करुन त्याची हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. पोलिस तेव्हापासूनच मारेकऱ्यांच्या शोधात होते.

हत्येचं गूढ उकललं!

अखेर पोलिसांनी या हत्येचं गूढ उकललं. पण जे समोर आलं, त्यामुळे कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. मारेकऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी सूत्रधाराला शोधून काढलं. मुलाच्या हत्येमागे दुसरं तिसरं कोणी नसून तर त्याची एनआरआय आई आरती धीर होती. आरती धीरने दोन साथीदारांच्या मदतीने पहिल्यांदा मुलाला दत्तक घेतलं. त्यानंतर त्याचा सव्वा कोटी रुपयांचा विमा काढला होता.

तेच पैसे मिळवण्यासाठी एनआरआय आईने मुलाचा काटा काढण्याचा कट रचला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरती धीरने नितीश मुंड आणि कंवलजीत रायजादा यांच्यासोबत मिळून हे भयावह कृत्य केलं. या तिघांची 2015 मध्ये पहिल्यांदा लंडनमध्ये भेट झाली होती. कंवलजीत आणि नितीश तिथे शिक्षण घेत होते.

झटपट कोट्यधीश बनण्यासाठी हत्या

ते दोघे एकाच रुममध्ये राहत होते, तर आरती त्यांची शेजारीण होती. झटपट कोट्यधीश बनण्याचा प्लॅन तिघांनी बनवला. प्लॅननुसार, त्यांनी गुजरातच्या एका वृत्तपत्रात जाहिरात दिली की, आम्हाला एका मुलाला दत्तक घ्यायचं आहे. त्यानंतर ते मुलाला पाहण्यासाठी गुजरातमध्ये आले आणि त्यांनी गोपाळ नावाच्या 12 वर्षीय मुलाची निवड केली.

असा होता प्लॅन!

प्लॅननुसार, 2016 मध्ये त्यांनी सर्व सरकारी औपचारिकता पूर्ण केल्या. यानंतर त्यांनी मुलाचा सव्वा कोटींचा विमाही काढला. 8 फेब्रुवारी 2017 रोजी व्हिसा मिळवण्यासाठी गोपाळला राजकोटला घेऊन गेले. आरती आणि तिच्या दोन्ही साथीदारांनी त्याच मुलाच्या अपहरण आणि हत्येसाठी 5 लाखांची सुपारी दिली होती.

परंतु सुपारी घेणाऱ्यांना मुलाचं अपहरण करता न आल्याने त्यांनी त्याच्यावर सुऱ्याने वार करुन हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला आणि दहा दिवसांनी हत्याकांडाचं गूढ उकलंल. पोलिसांनी महिलेचा साथीदार नितीशलाही अटक केली आहे.

तर आरोपी महिला आणि तिच्या आणखी एका साथीदाराचा शोध पोलिस घेत आहेत. याशिवाय मुलाची सुपारी घेऊन हत्या करणाऱ्यांच्याही मागावर पोलिस आहेत.