नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आधार कार्डच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात असताना, यूआयडीएआयने व्हर्च्युअल आयडी सुरु करण्याची घोषणा केली आहे. व्हर्च्युअल आयडी 16 अंकांचं असेल.


आधार कार्डमधील माहिती चोरी होत असल्याचे आरोप गेल्या काही दिवसांपासून होत होते. त्यातच एका इंग्रजी वृत्तपत्राने असाही दावा केला होता की, काही रकमेच्या बदल्यात आधार कार्डवरील माहिती मिळवणं अगदी शक्य आहे. दुसरीकडे, आरबीआयशी संबंधित एका संस्थनेही दावा केला होता की, आधार कार्डवरील माहिती सायबर गुन्हेगारांना मोठी मदतीची ठरते आहे.

आधार कार्डमधील माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा मात्र यूआयडीएआयने कायमच केला आहे. ती माहिती लीक होणं शक्य नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. मात्र तरीही खासगी सुरक्षेचं कारण पुढे करत यूआयडीएआयने व्हर्च्युअल आयडीची घोषणा केली आहे.

व्हर्च्युअल आयडी

सध्या जे आधार कार्ड आहे, त्यात एकूण 12 अंक असतात. मात्र व्हर्च्युअल कार्डमध्ये 16 अंक असतील.

  • कुणीही नागरिक यूआयडीएआयच्या वेबसाईटवर (https://uidai.gov.in) जाऊन आधीच्याच आधार कार्डच्या माहितीवरुन व्हर्च्युअल आयडी बनवू शकतो. ज्यांच्याकडे सध्या आधार कार्ड आहे, त्यांनाच हे शक्य आहे.

  • 16 अंकांचं हे व्हर्च्युअल आयडी ठराविक वेळेपुरते मर्यादित असेल. त्यामुळे मुदतीनंतर पुन्हा नवीन व्हर्च्युअल आयडी बनवावं लागेल. एकावेळी एकच आयडी बनवणं शक्य असेल, जुन्या आयडीची मुदत संपल्यानंतरच नवीन बनवू शकतात.

  • व्हर्च्युअल आयडीतून बँक किंवा फोन कंपन्यांना नागरिकांची केवळ मर्यादित माहिती (नाव, पत्ता, फोटो) मिळेल. एवढीच माहिती त्यांना गरजेची असते. त्यापलिकडे माहिती या कंपन्यांना दिली जाणार नाही.

  • आधार कार्ड ज्याप्रमाणे ओळखपत्र म्हणून वापरलं जाऊ शकतं, त्याच धर्तीवर व्हर्च्युअल आयडीही ओळखपत्र म्हणून वापरलं जाऊ शकतं.

  • जिथे कुठे ओळखपत्राची आवश्यकता असेल किंवा केवायसी करायचं असेल, तिथेही व्हर्च्युअल आयडी स्वीकारलं जाईल.


येत्या मार्च महिन्यापासून व्हर्च्युअल आयडीची सुरुवात केली जाईल. मात्र जूनपासून अनिवार्य केले जाईल. ज्या यंत्रणा या व्हर्च्युअल आयडीच्या दृष्टीने सुविधांमध्ये बदल करणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

आतापर्यंत देशभरात 119 कोटी आधार नंबर जारी केले गेले आहेत. कोणताही भारतीय  नागरिक आधार कार्ड काढू शकतं. भारतीय नागरिकत्त्वाचं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड असल्याचेही अनेकदा सरकारने म्हटले आहे. अनेक योजनांसाठीही आधार कार्ड अनिवार्य आहे.