‘नोटाबंदीचा निर्णयच चुकीचा’, उद्योगपती राजीव बजाजांची सरकारवर टीका
एबीपी माझा वेब टीम | 17 Feb 2017 06:11 PM (IST)
नवी दिल्ली: बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर जोरदार प्रहार केला आहे. ‘निर्णयच चुकीचा असेल, तर तो लागू करण्याच्या पद्धतींवर टीका करण्यात अर्थच नाही.’ असं म्हणत बजाज यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचा समाचार घेतला. ते काल नॉस्कॉमच्या वार्षिक नेतृत्व शिबिरात बोलत होते. नोटाबंदीची निर्णयच चुकीचा असल्यानं, त्यांच्या अंमलबजावणीच्या पद्धतींवर चर्चा करण्यात काहीच अर्थ नसल्याचं यावेळी बजाज म्हणाले. नोटाबंदीच्या धक्क्यातून उद्योग जगत अजूनही सावरलेलं नाही. बजाज ऑटोच्या विक्रीतही गेल्या वर्षाच्या तुलनेतही गेल्या तिमाहीत 16 टक्क्यांची कपात झाली आहे. 8 नोव्हेंबर 2016ला पंतप्रधान मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. काळा पैसा, नकली नोटा, भ्रष्टाचार याला आळा घालण्यासाठी ही नोटाबंदी करण्यात येत आहे. असं मोदी सरकारकडून सांगण्यात आलं होतं. या निर्णयानंतर काही महिने बँका आणि एटीएमबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या होत्या. अनेकांनी हा निर्णय योग्य आहे. पण याची अमंलबजावणी चुकीची असल्याचं म्हटलं होतं. तर हा निर्णयच चुकीचा असल्याचं काही जणांचं मत होतं. आता बजाज यांनी सुद्धा असंच मत व्यक्त केलं आहे. संबंधित बातम्या: