नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर आज नोकरदारांच्या बँक खात्यात पहिलाच पगार जमा होणार आहे. परंतु बँक खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आठवड्याला तुम्ही बँक खात्यातून 24 हजार रुपयेच काढू शकता.

तसंच एटीएममधून एका वेळी तुम्ही केवळ अडीच हजार रुपयेच काढू शकता. त्यामुळे खात्यात पगार असला तरी तो काढण्यावर निर्बंध असल्याने नोकरदारांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे.

नोटाबंदीचा आज 22वा दिवस आहे. पगार आज जमा होणार असल्याने बँक आणि एटीएमबाहेर लागणाऱ्या रांगा आणखी मोठ्या होण्याची शक्यता आहे.

नोटाबंदीनंतरच्या पहिल्या पगारासाठी मोठी तयारी केली आहे. देशभरातील 2 लाखांपैकी 1 लाख 70 हजार एटीएम  अपडेट झाले आहेत. म्हणजेच आज 90 टक्के 1 लाख 80 हजार एटीएममधून नव्या नोटा येण्यास सुरुवात होणार आहे.