Noida Bus Fire : नोएडा येथील यमुना एक्सप्रेसवेवर (Yamuna Expressway) जेवरजवळ बुधवारी रात्री एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. काश्मीरी गेट, दिल्ली येथून महोबाकडे जाणाऱ्या एका खासगी एसी स्लीपर बसला (Sleeper Bus) भीषण आग (Fire) लागून 9 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत 28 वर्षीय शशांक गुप्ता (Shashank Gupta) आणि त्याची 47 वर्षीय आई सुनीता गुप्ता (Sunita Gupta) यांचा दुर्दैवी अंत झाला. मृत्येशी झुंज देतानाही आईची साथ न सोडणाऱ्या शशांकच्या या त्यागाने उपस्थितांचे डोळे पाणावले आहेत.
Noida Bus Fire : "आई खाली उतरल्याशिवाय मी येणार नाही"
शशांक गुप्ता हा गुरुग्राममध्ये इंडिगो एअरलाइन्समध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. त्याची आई सुनीता गुप्ता गुडघ्यांच्या त्रासावर उपचारासाठी महिनाभरापासून त्याच्याकडे राहण्यास होत्या. महोबा जिल्ह्यातील चरखारी येथील भाजप नेते (BJP Leader) असलेले शशांकचे वडील नीरज गुप्ता यांच्या भावाला हृदयविकाराचा झटका आल्याने, मायलेकाने घाईघाईने महोबा गाठण्याचा निर्णय घेतला. रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी 'राज कल्पना ट्रॅव्हल्स'च्या बसच्या मागच्या बाजूला स्लीपर सीट बुक केली.
प्रवासादरम्यान चालकाच्या केबिनजवळ शॉर्ट सर्किटमुळे धूर निघू लागला. मात्र चालक आणि वाहकाने याकडे दुर्लक्ष करत स्मोकिंग सुरू ठेवल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले. बसमध्ये गोंधळ उडाला आणि प्रवाशांनी खिडक्या फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.
गुडघ्याच्या त्रासामुळे सुनीता यांना वेगाने पळता येत नव्हते. चालकाने आणि वाहकाने शशांकला एकट्याला बाहेर पडण्याची विनंती केली; परंतु शशांकने स्पष्ट शब्दांत सांगितले, "माझी आई बसमधून खाली उतरल्याशिवाय मी स्वतः बाहेर पडणार नाही." धुराचे लोट पसरत असतानाही तो आईला दरवाजाकडे ओढण्याचा प्रयत्न करत राहिला. अखेर श्वास गुदमरून दोघांचाही तिथेच कोसळून मृत्यू झाला.
Noida Bus Fire : अंगठी आणि उंचीवरून पटली पार्थिवांची ओळख
आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की, मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले होते. शुक्रवारी शवविच्छेदनानंतर रुग्णालयात सुनीता गुप्ता यांची ओळख त्यांच्या उंचीवरून, तर शशांकची ओळख त्याच्या बोटातील खास अंगठीवरून पटली. भाजप नेते नीरज गुप्ता यांना आपल्या मुलाचे आणि पत्नीचे पार्थिव पाहताना हुंदका अनावर झाला. "माझ्या लेकाने साक्षात मृत्यू डोळ्यासमोर असूनही आईची साथ सोडली नाही," असे सांगताना नीरज यांचा कंठ दाटून आला होता.
Noida Bus Fire : 9 जणांचा होरपळून मृत्यू
या दुर्घटनेत बसमधील 35 पैकी 26 प्रवासी वेळेत बाहेर पडल्याने वाचले, तर 9 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये मध्य प्रदेश, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील इतर प्रवाशांचाही समावेश आहे. वाहनाच्या वातानुकूलित यंत्रणेत आणि एलईडी लाईट्सच्या वायरिंगवर अतिरिक्त ताण आल्यामुळे हे शॉर्ट सर्किट झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शशांकचे पार्थिव त्याच्या मूळ गावी चरखारी येथे नेण्यात आले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
