कैलास सत्यार्थींचा चोरीला गेलेला नोबेल सापडला, चोरांना बेड्या
एबीपी माझा वेब टीम | 12 Feb 2017 09:45 AM (IST)
नवी दिल्ली : नोबेल पुरस्कार विजेते आणि सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थी यांचा चोरीला गेलेला नोबेल पुरस्कार अखेर सापडला आहे. मुख्य आरोपीसह इतरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सत्यार्थी यांच्या घरातून चोरीला गेलेली नोबेल पुरस्काराची प्रतिकृती आणि इतर सामान ताब्यात घेण्यात आलं आहे. नवी दिल्लीतील अलकनंदा अपार्टमेंटमध्ये 7 फेब्रुवारीच्या रात्री ही चोरी झाली. चोरटे घराचं कुलूप तोडून आत घुसले आणि नोबेल पुरस्काराच्या प्रतिकृतीसह पारंपरिक दागिने आणि रोकडही लंपास केली. कैलास सत्यार्थी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमेरिकेत गेले होते. घरात कुणीही नसल्याचं हेरत चोरट्यांनी डाव साधला. त्यांच्या अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 56 आणि 99 मध्ये त्याच रात्री चोरी झाली होती.