नवी दिल्ली : नोबेल पुरस्कार विजेते आणि सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थी यांच्या नोबेल पुरस्कार प्रतिकृतीसह सन्मानपत्र काही दिवसांपूर्वी राहत्या घरातून चोरीला गेलं होतं. त्यांचं हे सन्मानपत्र एक महिन्यानंतर दिल्ली जवळच्या संगम विहारमधील जंगलात सापडलं आहे. सन्मानपत्राचा शोध लागल्यानंतर सत्यार्थी यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

सत्यार्थी राहात असलेल्या नवी दिल्लीतील अलकनंदा अपार्टमेंटमधून 7 फेब्रुवारीच्या रात्री नोबेल पुरस्काराच्या प्रतिकृतीसह सन्मानपत्र आणि इतर सामान चोरीला गेलं होतं. चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून या सन्मानपत्रासह पारंपरिक दागिने आणि रोकडही लंपास केली होती.

याप्रकरणी 12 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी तीन जणांना तब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी चोरट्यांकडून नोबेल प्रतिकृती आणि दागिने जप्त केले. पण यामध्ये नोबेल सन्मानपत्राचा समावेश नव्हता. यानंतर चोरट्यांच्या जबानीवरुन संगम विहार परिसरातील जंगलात दोन दिवस कसून शोध घेतल्यानंतर काल हे सन्मानपत्र सापडलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी हे सन्मानपत्र एक कागदाचा तुकडा समजून फेकून दिलं होतं. पण काल शोध घेत असताना हे सन्मानपत्र जुन्या स्वरुपातच मिळालं. या सन्मानपत्रासोबत इतरही काही वस्तू मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, 2015 च्या जानेवारी महिन्यातच सत्यार्थींनी आपलं पदक राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडं सुपूर्द केलं होतं. त्यामुळे हे पदक राष्ट्रपती भवनाच्या संग्रहालयात सुरक्षित आहे.