पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गोवा काँग्रेसने राज्यपाल मृदुला सिन्हा यांना दुसऱ्यांदा पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
काँग्रेसच्या सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोव्यामध्ये मध्यरात्री दाखल झाले आहेत. भाजप आणि मित्रपक्षांशी चर्चा करुन मनोहर पर्रिकर यांच्यानंतर गोव्याचं नेतृत्व कोणाकडे सोपवायचं यासाठीच्या सर्व पर्यायांची चाचपणी नितीन गडकरी करत आहेत.
नितीन गडकरी यांनी काल रात्री गोवा फॉरवर्ड पार्टीच्या विजय सरदेसाई आणि एमजीपीच्या सुधीन ढवळीकर यांच्या आमदारांसोबत जवळपास दोन तास चर्चा केली. आज दिवसभरातील चर्चांनंतर अखेरचा निर्णय घेतला जाणार आहे.
गोवा विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांच नाव मुख्यमंत्रीपदासाठी सध्या आघाडीवर आहे. सर्व मित्रपक्षही सावंत यांना पाठिंबा देऊ शकतात. श्रीपाद नाईक यांचंही नाव चर्चेत होतं, मात्र भाजपच्या मित्रपक्षांचा नाईक यांना विरोध आहे.
गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते विजय सरदेसाई यांनीही आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचं म्हटलं आहे. आम्ही मनोहर पर्रिकर यांना समर्थन दिलं होतं, भाजपला नाही. मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर भाजप आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरच आम्ही आमचा निर्णय जाहीर करु, असं देखील सरदेसाई यांनी म्हटलं. मात्र राज्यात आम्हाला निवडणुका नको आहेत, आम्हाला स्थिर सरकार अपेक्षित आहे, हे देखील विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केलं.