नवी दिल्ली : डिसेंबर अखेरपर्यंत स्वच्छ गंगा मिशनअंतर्गतच्या सर्व प्रकल्पांची कंत्राटं निघाली पाहिजेत अशी जाहीर तंबी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिलीय. जलसप्ताहांतर्गत स्वच्छ गंगा मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी एक मीटिंग आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकारांना या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या सद्यस्थितीबद्दल त्यांनी माहिती दिली.


गंगा प्रदूषित होण्यामागे जी-10 शहरं आहेत, त्यात हरिद्वार, वाराणसी, कोलकाता यांचा समावेश होतो. जवळपास 9 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सध्या गंगा स्वच्छ करण्यासाठी मंजूर केले गेलेत. यासंदर्भात राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली असल्याचंही गडकरींनी सांगितलंय.

2019 च्या मार्चपर्यंत गंगा पूर्ण स्वच्छ नाही झाली, तरी गंगेच्या पाण्यात तुम्हाला थोडा सुधार नक्की दिसेल असं वक्तव्यही गडकरींनी केलंय.

गंगा स्वच्छतेसाठी सीएसआरअंतर्गत अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची मदतही घेतली जाणार आहे. 97 शहरांमध्ये असे विविध टप्पे निवडले असून 10 वर्षांसाठी खासगी कंपन्यांना ते दिले जाणार आहेत.

महाराष्ट्रात सुधीर मुनगंटीवार यांच्या खात्यानं वृक्षारोपणाचे जे भव्य कार्यक्रम राबवले गेलेत, त्याचं कौतुक करत गंगेच्या काठावरही याच पद्धतीने वृक्षारोपण करणार असल्याचं गडकरींनी म्हटलंय. मंत्रिमंडळ बदलात नुकतंच गंगा स्वच्छतेचं हे खातं उमा भारतींकडून हे खातं आता गडकरींकडे देण्यात आलंय.