Nitin Gadkari: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात देशातील वाढती गरिबी आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात ती एकाग्र झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ग्रामीण भागाच्या कल्याणासोबतच आर्थिक विकास करता यावा यासाठी संपत्तीचे विकेंद्रीकरण आवश्यक असल्याचे ते म्हणाले. नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी शेती, उत्पादन, कर आकारणी आणि पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारी अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. गडकरी म्हणाले, 'हळूहळू गरीब लोकांची संख्या वाढत आहे आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्ती एकवटत आहे. असे होऊ नये. अर्थव्यवस्था अशा प्रकारे वाढली पाहिजे की ज्यामुळे रोजगार निर्माण होतील आणि ग्रामीण भागाला चालना मिळेल.'
मोदी सरकारमधील मंत्री सरकारची पोलखोल करत आहे
दरम्यान, नितीन गडकरींच्या वक्तव्याचा दाखला देत काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. मोदींच्या खोटारडेपणाचा नितीन गडकरी यांनी फॅक्ट चेक केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मोदी एका रॅलीत बोलताना देशात आपल्या सरकारच्या प्रयत्नामुळे गरीबी कमी होत असल्याचा दावा करत आहेत. याच वक्तव्याला गडकरी यांनी केलेल्या विधानाला जोडत काँग्रेसने मोदी सरकारमधील मंत्री सरकारची पोलखोल करत असल्याचे म्हटले आहे. दोन्ही नेत्यांच्या भाषणाची क्लिप ट्विटमध्ये पोस्ट केली आहे.
दरम्यान, गडकरी म्हणाले की, अर्थव्यवस्था अशा प्रकारे वाढली पाहिजे की ज्यामुळे रोजगार निर्माण होतील आणि ग्रामीण भागाला चालना मिळेल. ते म्हणाले, 'आम्ही अशा आर्थिक मॉडेलचा विचार करत आहोत जे रोजगार निर्माण करेल आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना देईल. संपत्तीचे विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे आणि या दिशेने अनेक बदल करण्यात आले आहेत.' गडकरी यांनी माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या उदारमतवादी आर्थिक धोरणांचे कौतुक केले, परंतु अनियंत्रित केंद्रीकरणाविरुद्ध इशारा दिला. ते म्हणाले, 'आपल्याला याची काळजी घ्यावी लागेल.'
त्याला तत्वज्ञान शिकवता येत नाही
भारताच्या आर्थिक रचनेचा संदर्भ देत गडकरी यांनी जीडीपीमध्ये विविध क्षेत्रांच्या योगदानातील असमतोल अधोरेखित केला. ते म्हणाले, 'उत्पादन क्षेत्राचे योगदान 22-24 टक्के आहे, सेवा क्षेत्र 52-54टक्के आहे, तर ग्रामीण लोकसंख्येच्या 65-70 टक्के लोकसंख्येवर अवलंबून असलेल्या कृषी क्षेत्राचे योगदान फक्त 12 टक्के आहे.' स्वामी विवेकानंदांचा उल्लेख करून ते म्हणाले की ज्या व्यक्तीचे पोट रिकामे आहे त्याला तत्वज्ञान शिकवता येत नाही.