Nirma University Viral Video: गुजरातमधील अहमदाबाद येथील प्रसिद्ध निरमा युनिव्हर्सिटीमध्ये (Nirma University) एका कार्यक्रमादरम्यान प्राध्यापक (Professor) आणि विद्यार्थ्यामध्ये (Student) झालेला वाद सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. 'गोलमाल' (Golmaal) या चित्रपटातील एक प्रसिद्ध डायलॉग मारल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख (HOD) डॉ. एच. के. पटेल भडकले आणि त्यांनी विद्यार्थ्याची कॉलर पकडून त्याला कडक इशारा दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला असून विद्यार्थी संघटना एनएसयूआयने (NSUI) याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

Continues below advertisement

Nirma University Viral Video: काय आहे नेमके प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, निरमा युनिव्हर्सिटीमध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन (Stand-up Comedian) रजत सूद हेदेखील उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एच. के. पटेल हे मंचावरून उपस्थितांना संबोधित करत होते. त्याच वेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका विद्यार्थ्याने गंमत म्हणून 'गोलमाल' चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय असलेला "जल्दी बोल, सुबह पनवेल निकलना है" हा डायलॉग मारला.

Nirma University Viral Video: स्टेजवर बोलावून कॉलर पकडल्याचा आरोप

वायरल व्हिडिओनुसार, विद्यार्थ्याची ही टिप्पणी ऐकताच प्राध्यापक पटेल अत्यंत संतप्त झाले. त्यांनी त्या विद्यार्थ्याला तात्काळ मंचावर बोलावून घेतले. मंचावर आल्यानंतर प्राध्यापकांनी विद्यार्थ्याची कॉलर पकडली आणि 'शिक्षकांचा अपमान करणाऱ्यांविरुद्ध कोणत्याही थराला जाऊ', असा इशारा दिला. तसेच कॅम्पसमध्ये शिक्षकांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे सांगत शिस्तभंगाच्या कारवाईची धमकी दिली.

Nirma University Viral Video: एनएसयूआयची कठोर कारवाईची मागणी

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर गुजरात एनएसयूआयने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. एनएसयूआयचे उपाध्यक्ष वेदांत सिंह तोमर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आरोप केला की, हा विद्यार्थ्याचा शारीरिक आणि मानसिक छळ आहे. विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित प्राध्यापकाने जाहीर माफी मागावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

Nirma University Viral Video: आंदोलनाचा इशारा

एनएसयूआयच्या प्रतिनिधींनी जेव्हा यासंदर्भात प्राध्यापकांशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी हा विद्यापीठाचा अंतर्गत विषय असल्याचे सांगून बोलणे टाळले. प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जावीत, अन्यथा कॅम्पसमध्ये शांततापूर्ण मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा विद्यार्थी संघटनेने दिला आहे. सध्या या घटनेवरून विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

आणखी वाचा 

AI Impact on Software Engineers: 'AI तूने क्या किया?' एका इंजिनिअरच्या पोस्टने टेक जगतात खळबळ; श्रीधर वेम्बू ते एलन मस्कही बोलले, नेमकं काय घडलं?