नवी दिल्ली : केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी मनमाड ते इंदूर या रेल्वेमार्गाची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत लवकरच या कामाचं भूमीपूजन होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत नितीन गडकरींनी दिली.


हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागू शकतो. पण तीन ते चार वर्षात हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास नेण्याचे आदेश दिले आहेत, असंही गडकरी म्हणाले.

‘धुळ्याजवळ ड्राय पोर्ट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक, कृषीविषयक विकासाला चालना मिळेल,’ असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.

दरम्यान, कल्याण-कसारा तिसऱ्या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली आहे. तसंच बऱ्याच दिवसांपासून मागणी होत असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गालाही मंजुरी देण्यात आली, अशी माहिती नितीन गडकरींनी दिली.

कसा असेल मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग?

- 362 किलोमीटरच्या या रेल्वेमार्गासाठी आठ हजार 8574 कोटींचा खर्च येणार आहे.

- महाराष्ट्रातले 186 किमी आणि मध्य प्रदेशमध्ये 176 किमी असं एकूण 362 किमी अंतर पार करता येणार

- रेल्वेमार्गादरम्यान एकूण 595 पूल उभारले जाणार

- रेल्वे पूर्णपणे ब्रॉडगेज असणार

- 2008  हेक्टर जमिनीचं अधिग्रहण करावं लागणार

-20 वर्षांच्या मुदतीचं पाच हजार 445 कोटींचं कर्ज

- दिल्ली ते चेन्नई, दिल्ली ते बंगळुरु मार्गावरचं अंतर 350 किमीने कमी होईल