India-Sri Lanka Illegal Drugs Case : राष्ट्रीय तपास संस्था (National Investigation Agency) म्हणजेच एनआयए (NIA) ने मोठी कारवाई केली आहे. एनआयएने ड्रग्स प्रकरणात (Drugs Case) 10 श्रीलंकेसह 13 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यांच्यावर अतिरेकी संघटना एलटीटीई (LTTE) म्हणजेच लिट्टे पुन्हा सक्रिय करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.


ड्रग्स प्रकरणी 10 श्रीलंकन लोकांसह 13 जणांविरुद्ध आरोपपत्र


भारत आणि श्रीलंकेमध्ये अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची अवैध तस्करी केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) 10 श्रीलंकन ​​नागरिकांसह 13 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने शुक्रवारी 16 जून रोजी, एक निवेदन जारी करत याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये एनआयएनं सांगितलं आहे की, अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्र तस्करीचे हे प्रकरण दोन्ही देशांतील दहशतवादी गट लिट्टे (LTTE) पुन्हा सक्रीय करण्याच्या प्रयत्नांशी संबंधित आहे.


लिट्टे अतिरेकी संघटना पुन्हा सक्रीय करण्याचा कट


एनआयएने सांगितलं आहे की, आरोपपत्रात नाव असलेल्या आरोपींनी विझिंजम पोर्ट ड्रग्ज रिकव्हरी प्रकरणातील एका आरोपीसोबत भारत आणि श्रीलंकेमध्ये लिट्टे अतिरेकी संघटना पुन्हा सक्रीय करण्याचा कट रचला. यासाठी लागणाऱ्या निधीसाठी त्यांनी अंमली पदार्थांची अवैध तस्करी करण्याचा मार्ग निवडला. गेल्या वर्षी 8 जुलै रोजी या प्रकरणाची दखल घेत एनआयएने गुन्हा दाखल करून तामिळनाडूमधून 13 जणांना अटक केली होती. त्यांच्यावर आता आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.


80 लाखांची रोकड जप्त


NIA नं सांगितलं आहे की, आरोपींकडून प्री-अॅक्टिव्हेटेड भारतीय सिमकार्ड असलेले अनेक मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. एनआयएने तपासादरम्यान अंमली पदार्थांच्या व्यवहाराशी संबंधित विविध डिजिटल उपकरणे, 80 लाख रुपये रोख आणि नऊ सोन्याचे बार्सही जप्त केले होते. ही रोकड आणि सोने अंमली पदार्थांच्या विक्रीतून मिळालेले होते. आरोपींमध्ये क्रिप्टो प्लॅटफॉर्म वापरून अनेक व्यवहार केल्याचे आढळून आले.


तमिळ वाघांची अतिरेकी संघटना लिट्टे


श्रीलंकेतील तमिळ अतिरेकी संघटना आणि एलटीटीई (LTTE) म्हणजेच तमिळ लिबरेशन टायगर ईलमचा (Liberation Tigers of Tamil Eelam) ही बंडखोर संघटना आहे. श्रीलंकेत तामिळ जनतेवर होत असलेला अत्याचार, दुजाभाव या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला होता. त्यातून सिंहली विरुद्ध तामिळ असा वांशिक गृहसंघर्ष सुरू होता. LTTE ने तामिळींच्या अत्याचाराविरोधात संघर्ष सुरू केला. श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्वेला स्वतंत्र तमिळ राज्य निर्माण करण्याची मागणी केली. एलटीटीईने सुमारे तीन दशकांपर्यंत श्रीलंकेमध्ये दहशत निर्माण केली होती. त्यानंतर 2009 मध्ये श्रीलंका सरकार आणि लष्कराने एलटीटीई विरोधात मोठी मोहीम हाती घेतली होती.