मुंबई : डी गँगशी संबंध असल्याच्या संसशयावरून छोटा शकीलचा (Chota Shakeel) साडू मोहम्मद सलीम मोहम्मद इक्बाल कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट याला अटक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी एनआयएने सलीम याला अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते. एनआयएने काही महिन्यांपूर्वी डी कंपनीशी संबंध असल्याप्रकरणी आरिफ भाईजान आणि त्याचा भाऊ शब्बीर या दोघांना अटक केली होती.


मे महिन्यात एनआयएने मुंबईतील 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात डी गॅंगशी संबंध असलेल्या अकनेकांवर गुन्हे दाखल केले होते, याच प्रकरणी छापे टाकून पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.


एनआयएने मुंबईतील ग्रँट्रोड भागात राहणाऱ्या मोहम्मद सलीम मोहम्मद इक्बाल कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट याच्या घरावरही छापा टाकला होता. छाप्यादरम्यान त्याच्या घरी काही कागदपत्रे सापडली होती, ती जप्त करण्यात आली होती. 
 
कोण आहे सलीम फ्रुट?


कौटुंबिक नात्यामुळे सलीम फ्रूट छोटा शकीलच्या अगदी जवळ आहे. छोटा शकील त्याला आपल्या मुलाप्रमाणे वागवतो. छोटा शकीलच्या पत्नीच्या धाकट्या बहिणीशी सलीमचा विवाह झाला आहे. सलीमचे वडील उमर कुरेशी हे मुंबईतील नल बाजार परिसरात फळे विकायचे. त्यामुळे सलीमला सलीम फ्रूट म्हणून संबोधले जाते.


 या टोळीत सामील होण्यापूर्वी सलीम दुबईला फळे निर्यात करायचा. दुबईमध्ये त्याचा एक आलिशान बंगला देखील आहे. सलीमविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 दरम्यान, एनआयएने मुंबईतील माहीम भागातील सुहेल खंडवानी यांच्या घरावर छापा टाकला होता. खांडवानी हे मुंबईतील माहीम दर्गा आणि हाजियाली दर्ग्याचे विश्वस्त आहेत. घरावर छापा टाकल्यानंतर एनआयएचे अधिकारी त्यांना माहीम येथील त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले आणि तेथेही त्यांची चौकशी करण्यात आली.


या प्रकरणात  NIA ने अब्दुल कय्युम नावाच्या व्यक्तीची देखील चौकशी करत आहे, जो 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी होता. परंतु, नंतर खटल्याच्या वेळी पुराव्याअभावी विशेष टाडा न्यायालयाने सर्व आरोपातून त्याला निर्दोष मुक्त केले.