श्रीनगर : पर्यटनासाठी न जाणारे तसे तुलनेनं कमीच. अशाच काही पर्यटनवेड्या मंडळींसाठी थेट जम्मू काश्मीरहून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. येत्या काळात या भागात जाण्याचा बेत तुम्ही आखत असाल, तर ही माहिती तुमच्या फायद्याची नक्कीच ठरु शकते. कारण, इको- टुरिझम या संकल्पनेला चालना देण्यासाठी म्हणून सरकारने 7 नव्या ट्रेकिंगच्या वाटांना परवानगी दिली आहे.
वनविभागाच्या अख्त्यारित येणाऱ्या या वाटा अनेकांसाठीच आतापासूनच कुतूहलाचा विषय ठरत आहेत. शासनानं इथं वनविभाग आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठीसुद्धा काही महत्त्वाची पावलं उचलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये विश्रामगृह आणि वन्यप्रेमींसाठी अन्य काही सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
सदर सुविधेमुळं आणि शासनाच्या निर्णयामुळं 29 वन विश्रामगृहांचं बुकिंग पर्यटकांना करता येणार आहे. शिवाय इंस्पेक्शन हटचीही बुकींग करता येणार आहे. 1 मे 2021 पासून ही सुविधा सर्वांसाठी खुली होणार आहे.
ट्रेकिंगसाठी खुल्या होणाऱ्या नव्या वाटा
सर्वसामान्य पर्यटकांसाठी खुल्या होणाऱ्या ट्रेकिंगच्या वाटांमध्ये बहू, सुधमहादेव, थेईन, त्राल, दचिगम, ओवेरा अरू, थज्वस, ख्र्यू, खोन्मो अशा भागांचा जंगलवाटांचा समावेश आहे.
पर्यटकांच्या सेवेसाठी वव विभाग एक ऑनलाईम पोर्टल सुरु करणार आहे. सुरुवातीच्या काळात प्रथम येणाऱ्यांस प्राधान्य या अटीवर पर्यटकांना या सुविधेचा आनंद घेता येणार आहे. या सेवेता पुढचा टप्पा 1 जुलैपासून सुरु होणार आहे. ज्यामुळं पर्यटकांना निसर्गाच्या आणखी जवळ जाण्याची संधी मिळणार आहे.
आतापर्यंत वन अधिकाऱ्यांच्या वापरापुरताच सीमीत असणारी विश्रामगृह यापुढं ट्रेकर्स मंडळींना वापरता येणार आहेत. यामध्ये ट्रेकिंगचे विविध स्तरही अंदाजात घेण्यात आले आहेत. वन्यजीवप्रेमी आणि अभ्यासक, तसंच निसर्गापोटी कुतूहल असणाऱ्या युवा पर्यटकांसाठी जम्मू काश्मीरमध्ये हे पाऊल उचलण्यात आलं आहे. त्यामुळं या भागाच्या पर्यटन व्यवसायाला आणि सहाजिकच राहणीमानालाही मोठा फायदा मिळणार आहे.