Parliament Building Inauguration: नव्या संसदेच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमावरुन शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून ही टीका करण्यात आली असून यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. ज्या लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपला अच्छे दिन दाखवले त्यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं नाही हे दुर्दैव असल्याचं म्हटलं आहे. मी आणि केवळ मीच अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका असल्याचं सामनामध्ये म्हटलं आहे.


सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या संसदेच्या इमारतीचं अशा प्रकारे उद्धाटन करत आहेत की जसं काही दिल्लीतील भाजपच्या कार्यालयाचं उद्धाटन करत आहेत. हा कार्यक्रम जसा भाजपचा खासगी कार्यक्रम असल्यासारखं वाटत असून त्यामध्ये विरोधी पक्षांनाही आमंत्रण दिलं नाही अशी टीका करण्यात आली आहे. 


संपादकीयमध्ये पुढे म्हटलं आहे की, नव्या संसदेच्या उद्धाटनाला देशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनाही निमंत्रण देण्यात आलं नाही. संसदेतील विरोधी पक्ष नेत्याचा दर्जा हा पंतप्रधानांच्या स्तराचा असतो. पण उद्धाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेत विरोधी पक्षनेत्याचं नावच नाही. त्यांचं जर नाव असतं तर लोकशाहीची शोभा वाढली असती. 


लालकृष्ण अडवाणी यांचा उल्लेख


सामनाच्या संपादकीयमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, ज्या लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपला अच्छे दिन दाखवले त्यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं नाही हे दुर्दैवी आहे. ज्या ठिकाणी देशाच्या राष्ट्रपतींना आमंत्रण दिलं जात नाही त्या ठिकाणी तुम्हा-आम्हाला आमंत्रण दिलं  किंवा नाही याचा काय फरक पडतोय?


सामनामध्ये लिहिलं आहे की, राष्ट्रपतींनी या नव्या संसदेचं उद्धाटन करणं अपेक्षित होतं. पण मी हे संसद भवन बनवलं, ही माझी संपत्ती आहे त्यामुळे त्याच्या कोनशिलेवर फक्त माझंच नाव असावं, मी आणि केवळ मी... हीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची नीती आहे. भाजपचे हे धोरण लोकशाहीसाठी मारक आहे. 


संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर 20 राजकीय पक्षांनी बहिष्कार घातला आहे. यामध्ये काँग्रेस, TMC,DMK, JDU, आप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), माकप, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय जनता दल या बड्या पक्षांचा समावेश आहे. 


या बातम्या वाचा: