नवी दिल्ली : नवी दिल्लीमधील लोधी रोडवर असलेल्या सीबीआय मुख्यालयाला गुरुवारी सकाळच्या सुमारास आग लागली. ही आग पार्किंग एरियातील इलेक्ट्रॉनिक रूम लागल्याची माहिती मिळाली आहे. आग लागल्यानंतर काही वेळात भीषण आगीचे लोळ बाहेर येताना दिसले. आग लागल्याचं समजताच सर्व अधिकारी बाहेर पडले. अग्निशामक दलाच्या पाच गाड्यांच्या मदतीनं आग आटोक्यात आणली आहे. सध्या तिथं कुलिंगचं काम सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या आग आटोक्यात आली आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळं लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. काही लोकांच्या माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळं लागल्याचं सांगितलं जात आहे. या आगीत सुदैवाने कुठलीही प्राणहानी किंवा वित्तहानी झाली नसल्याचं सांगितलं गेलं आहे.