NEET paper leak case : देशातील NEET-UG वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेला कथित महाघोटाळा आणि शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या अनियमिततेविरोधात देशाची राजधानी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. आंदोलन अधिक तीव्र झाले आहेत. या आंदोलनाच्या ठिकाणी राजू शेट्टी व रासपचे नेते महादेव जानकर यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेऊन लढ्याला पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना राजू शेट्टींनी केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला.
केंद्र सरकारने आपला घमंड आणि अहंकार बाजूला ठेवावा
केंद्र सरकारने आपला घमंड आणि अहंकार बाजूला ठेवावा. देशाच्या भवितव्याशी, म्हणजेच या निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार सरकारला नाही असे शेट्टी म्हणाले. सरकारच्या इशाऱ्यावर ज्या पध्दतीने पोलिसांनी अमानुषपणे विद्यार्थ्यांना व नागरिकांना मारहाण केली आहे, हे हदय पिळावून टाकणारे आहे. या परीक्षा घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. देशातील बळीराजा आणि संपूर्ण जनता या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे शेट्टी म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार
या आंदोलनाला देशातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी आपला सक्रिय पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी 28 जूनपासून जंतर-मंतर येथे आमरण उपोषण सुरू केले होते. सततच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, प्रकृती चिंताजनक असतानाही वांगचुक यांनी रुग्णालयातूनच आपले उपोषण पुढे सुरू ठेवले असून, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार केला आहे. जनसामान्यांचा आंदोलनाला वाढता पाठिंबा जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळी देशभरातून हजारो विद्यार्थी एकत्र आले आहेत. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात पेटून उठलेल्या या तरुणांना दिल्लीतील नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसाठी जेवणापासून ते वैद्यकीय सुविधेपर्यंतच्या सर्व आवश्यक गरजांची पूर्तता समाजातील विविध घटकांकडून स्वेच्छेने केली जात आहे असे शेट्टी म्हणाले.
नीट पेपरफुटी प्रकणावरुन दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांनी विविध संघटनांनी पाठिंबा दिली आहे. महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी जोर धरत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी एकत्रित मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याची माहितची मिळत आहे.