नवी दिल्ली: कारगिल युद्धावेळी रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ हे थोडक्यात बचावले. कारण भारतीय वायूदलाचं विमान पाकिस्तानच्या ज्या लष्करी तळावर बॉम्बहल्ला करण्यासाठी निघालं होतं. तिथेच शरीफ आणि मुशर्रफ हे उपस्थित होते. ऐनवेळी माजी एअर मार्शल ए.के.सिंह यांनी बॉम्बहल्ला न करण्याचे आदेश त्यावेळी दिले होते. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली.
तत्कालीन वाजपेयी सरकारनं वायूसेनेला एलओसी पार न करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यामुळे हा आदेश लक्षात घेऊनच ए. के. सिंह यांनी बॉम्बहल्ला थांबवला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, 24 जून 1999 रोजी भारतीय वायूसेनेच्या एका लढाऊ विमानानं एलओसीपासून जवळच असणाऱ्या पाकच्या एका लष्करी तळावर हल्ला करण्यासाठी अटॅक सिस्टम लॉक केली होती. पण त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या लढाऊ विमानातील त्यावेळचे वरिष्ठ पायलट ए. के. सिंह यांनी हल्ला न करण्याचा रेडिओ मेसेज हल्ल्याच्या तयारीत असलेल्या लढाऊ विमानाला दिला.
'पण त्यानंतर काही वर्षांनी ही माहिती आम्हाला समजली की, पाकिस्तानच्या या लष्करी तळावर पंतप्रधान नवाज शरीफ आणि लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ हे उपस्थित होते. कारगिल युद्धावेळी ते आपल्या सैनिकांना संबोधित करण्यासाठी तिथे आले होते.' अशी माहिती ए. के. सिंह यांनी दिली.
एबीपी न्यूजनं त्यावेळचे वरिष्ठ पायलट ए. के. सिंह यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी याबाबत बरीच माहिती दिली. 'सरकारनं स्पष्ट शब्दात आम्हाला सांगितलं होतं की, वायूसेनेनं एलओसी पार करु नये.'
एअर मार्शल ए. के. सिंह
काय घडलं नेमकं त्यावेळी?
एबीपी न्यूजशी बातचीत करताना ए. के. सिंह यांनी या घटनेची संपूर्ण माहिती दिली. “रात्री आणि दिवसाही बॉम्बिंग सुरुच होतं. पण त्या लष्करी तळावर नवाज शरीफ किंवा मुशर्रफ हे येणार आहेत याबाबत आम्हाला कोणतीही माहिती मिळाली नव्हती. त्यावेळी मश्को व्हॅलीजवळ बॉम्बहल्ला करण्यासाठी आमचं विमान सज्ज होतं. त्यासाठी ट्रॅकिंग सुरु होतं. त्यावेळी आम्हाला ट्रॅकिंग सिस्टिमवर एक लष्करी कॅम्प असल्याचं दिसलं. आम्ही बॉर्डर ओलांडू नये असे आदेश देण्यात आले होते.”
“सकाळची वेळ असूनही तळावर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सैनिक आम्हाला दिसले. त्यामुळे मला जरा संशय आला. सकाळच्या वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात सैनिक जमा होणं ही पाकिस्तानची चूक असू शकते. असं मला वाटलं. म्हणून मी माझ्या बाजूच्या विमानातील पायलटला तात्काळ हल्ला थांबवण्याचे आदेश दिले. त्यानंतर आम्ही त्यांच्या तळाच्या बाजूनं एक फेरी मारली आणि हल्ला न करता माघारी फिरलो.” अशी माहिती ए. के. सिंह यांनी दिली.
दरम्यान, एअर मार्शल ए. के. सिंह यांनी हे देखील स्पष्ट केलं की, जर आम्हाला माहिती मिळाली असती की, शरीफ आणि मुशर्रफ हे तिथे उपस्थित होते तरी देखील आम्ही हल्ला केला नसता. कारण, भारताची तशी कधीही वृत्ती नाही.
ए. के. सिंह हे 2007 साली एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ या पदावरुन निवृत्त झाले.