Road Rage Case : नवज्योत सिंह सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाने  मोठा झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने 34 वर्ष जुन्या प्रकरणात सिद्धू यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सन 1988 मध्ये झालेल्या एका पार्किंगच्या वादातून सिद्धू यांनी एका वृद्धाला मारहाण केली होती. त्यानंतर उपचारा दरम्यान त्या वृद्धाचा मृत्यू झाला. याआधी नवज्योत सिंह सिद्धू यांना दिलासा मिळाला होता. मात्र, पीडित पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सिद्धू यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 


>> प्रकरण काय आहे, जाणून घ्या 6 मुद्यांच्या आधारे


> 27 डिसेंबर 1988 च्या संध्याकाळी सिद्धू हे त्यांचे मित्र रुपिंदर सिंग संधूसोबत पटियालाच्या शेरावले गेटच्या बाजारात पोहोचले होते. हे ठिकाण त्यांच्या घरापासून 1.5 किमी अंतरावर आहे. तेव्हा सिद्धू क्रिकेटपटू होता. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू होऊन फक्त एक वर्ष झाले होते.


> त्याच मार्केटमध्ये कार पार्किंगवरून 65 वर्षीय गुरनाम सिंग यांच्याशी त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धू यांनी गुरनाम सिंगला पाडले. त्यानंतर गुरनाम सिंग यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते.


> त्याच दिवशी सिद्धू आणि त्यांचा मित्र रुपिंदर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सत्र न्यायालयात खटला चालला.  वर्ष 1999 मध्ये सत्र न्यायालयाने हा खटला फेटाळून लावला.


> वर्ष 2002 मध्ये पंजाब सरकारने सिद्धूविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. दरम्यान, सिद्धू यांनी राजकारणात प्रवेश केला. वर्ष 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर अमृतसर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते.


> उच्च न्यायालयाने डिसेंबर 2006 मध्ये निकाल सुनावला. यामध्ये उच्च न्यायालयाने सिद्धू आणि संधूला दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. सिद्धू यांनी त्यानंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.


> उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांनी सिद्धूच्यावतीने खटला लढवला होता. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली.  सन 2007 मध्ये सिद्धू पुन्हा अमृतसरमधून निवडणूक जिंकले.